Saturday, 16 January 2016

… शेवटचा पर्याय ?

'अरे त्या कल्पनाने आत्महत्या केली !'
मित्राने त्याला आलेला संदेश मला पोहोचता केला. तो तर कामाला लागला ,पण माझ्या डोक्यातून काही केल्या ती घटना जात नव्हती . ऐन विशीत असताना लाभलेलं आयुष्य एका क्षणात संपवून टाकले.

           तिच्या जाण्याने जगाच्या लोकसंख्येत काही फरक जाणवणार नाही ,पण ज्यांच्यासाठी ती "जग " होती अशा तिच्या आई-वडिलांना मात्र मोठी दुखापत झालीये. ती तर निघून गेली सोबत काही प्रश्नांची उत्तरे घेऊन, पण त्या दोघांना अनुत्तरीत केलं . मुळात आत्महत्येचा विचार करणे देखील चुकीचे आहे. अन म्हणूनच कि काय कायद्याने तो गुन्हा धरला जातो.

            कोणीतरी बरोबरच म्हटलेले आहे,"हिम्मत लागते जगण्यासाठी अन समोर आलेल्या संकटांना तोंड देण्याची."पण ज्यांना स्वता:च्या क्षमतांबद्दल शंका वाटत असते किंवा काहीतरी चुकीचे वागल्याची भावना मनात सलते तेच असले भ्याडपणाचे पर्याय निवडतात. समाज काय बोलेल या कल्पनेनेच त्यांच्या मनात विचारांचे काहूर माजते. अहो झालेल्या घटनेनंतर लोकं त्याची चर्वणचर्चा करतीलही ,अन कोपऱ्यात असलेल्या कापराप्रमाणे काही दिवसांत ती विरुन सुद्धा जाईल पण खरा फरक पडतो तो जन्मदात्यांना ,जिच्या भविष्यासाठी त्यांची स्वप्ने असतात ,त्यांनाच तिच्याबद्दलचे वाईट स्वप्न पडावे ?

            काल -परवापर्यंत समोर हसणारी , खेळणारी आपली मुलगी आज नाहीये ,नुसता हाच विचार त्यांच्या पोटात गोळा आणतो. तुम्ही केलेल्या चुकांचे प्रायश्चित्त स्वता:च करा. अन करायचेच असेल तर जिद्दीने नवे आयुष्य सुरु करा ,तुमची शिक्षा पालकांनी का भोगावी ? झालेल्या चुका सुधारता येतात पण एकदा गेलेला जीव कसा परत येणार ?

           जसे कुठल्याही कुलुपाला चावी असतेच , तसे समस्या कुठलीही असू देत , मार्ग सापडतात . पण आत्महत्या हा त्यावरचा उपाय नव्हे …कधीच नसावा …


अनमोल आहे जीवन
अर्ध्यावर नको संपवू
दोन पाऊले मागे जा
पण चालणे नको थांबवू

येतील समस्या पुढ्यात हजार
करतील तुझ्यावर प्रहार
राहा तू त्यांस तयार
पण मानू नकोस कधी हार

चुकल्या असतील वाटा
अन निर्णय चुकले तुझे
तरीही नको शोधू पळवाटा
आयुष्य नाही दुजे

प्रायश्चित्त करता येईल
मृत्यूला का निवडावे ?
सुकर सारे नक्कीच होईल
आयुष्य का सोडावे ?

आत्महत्येचा विचार मातीमोल
आयुष्य का संपवायचे ?
जीवन तुझे आहे अनमोल
त्याचे रंग हे जगुनच पहायचे…   

6 comments:

  1. great... poetry as well.. very nice.. its always a privilege to read ur writings..

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. तुम्ही केलेल्या चुकांचे प्रायश्चित्त स्वता:च करा. अन करायचेच असेल तर जिद्दीने नवे आयुष्य सुरु करा.. great line👍

    ReplyDelete
  4. खूपच छान ब्लॉग आहेत।।।वाचल्याने खूपच छान वाटते

    ReplyDelete
  5. दोन पावले मागे जा
    पण चालणे नको थांबवू...great lines ...संपुर्ण लेख एखाद्याचं जीवन बदलवेल ...असा आहे...👌👌👌👍👍👍👍👌👌👍

    ReplyDelete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete