Saturday 26 August 2017

हि तर 'स्त्रीयांची ' इच्छा

              दर वर्षीप्रमाणे ह्या  वर्षीसुद्धा अगदी काठावर  सुट्टी मिळाली  , गणेश चतुर्थी साठी .  १७-१८   तासांच्या  प्रवासा नंतर घरी पोहोचलो . आल्यावर लगेचच घरातल्या गणेश मूर्तीची  प्रतिष्ठापना केली . मंडळाच्या गणपतीची तयारी बघायला निघालो तर समजलं कि ह्यावेळीचा गणेशोत्सव  थोडा  वेगळा आहे . अध्यक्षांपासून  खजिनदारापर्यंत सर्व जबाबदारी महिला मंडळाने लीलया पेललीये . अगदी वर्गणी गोळा करण्यापासून सर्वच महिलांनी हिरीरीने भाग घेतला . देणगी  देणार्याला पण विश्वास होताच कि दिलेली देणगी सत्कारणी लागणार म्हणून . एरवी  घरातलं बजेट काटेकोरपणे सांभाळणाऱ्या ह्या स्त्रिया हेदेखील बजेट  सांभाळू शकतात यात तिळमात्र शंका नाही . 

            मी अगदी लहान  असल्यापासून बघत आलोय , मूर्तीची प्रतिष्ठापना असो  किंवा इतर कामे  आदी सर्व गोष्टी पुरुष मंडळी , तरुण मुले बघत असत . किंबहुना  तथाकथित पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे सर्वत्र हेच बघावयास मिळते . साहजिकच सर्व बाबतीत त्यात पुरुषांचा उजवेपणा दिसू लागतो किंवा अहम दिसतो . 
कर्कश आवाजात गाणी वाजवणे हा त्यातलाच एक प्रकार . काळाच्या ओघात सुमधुर गणपतीची गाणी , आरत्या बाजूला सारून तिथे "मुन्नी बदनाम" होत असते. वाटतच नाही गणपती बसलेत कि 'कार्य(न )कर्ते '  पार्टी करायला बसलेत .

            स्वखुशीने , यथाशक्ती वर्गणी जमा करण्याचे दिवस आता मागे पडलेत . २० - २५ कार्य(न)कर्त्यांची  'गॅंग ' घरात घुसून अपेक्षित असलेली रक्कम भेटल्याशिवाय  न सोडणारी . मूर्ती , इतर शोभीकरण , देखावे  करून उरलेले  वर्गणीचे पैसे स्टेज खालीच बसून पत्ते  खेळणे  अन तत्सम कारणांसाठी  उडवले जातात . ह्या गोष्टींची इतरांना देखील कुणकुण असते पण त्यावर भाष्य करण्यास  तयार  नसतं . कारण  मंडळ राजकीय पक्षांच्या कुठल्यातरी भाऊ - दादा - आबांच्या अखत्यारीत असतं . अन गणपतीपेक्षाही त्यांचाच 'वरदहस्त ' जास्त मोठा असतो . 

           लोकमान्य टिळकांनी ह्यासाठी  कधीच सार्वजनिक गणेशोत्सव सुरु  केला नव्हता . त्यांचा उद्देश  लोकांनी एकत्र यावे , बाहेर पडून इंग्रज सरकार विरुद्ध लढा देणे हा होता . आज त्याच्या वास्तवाने वेगळेच रूप धारण केले आहे . युद्ध आज देखील संपले नाहीये , भ्रष्टचारा विरुद्ध अन प्रत्यक्ष गणेशाच्याच नावाखाली चाललेलं . कुठेतरी , कधीतरी हे थांबायलाच हवं ना ?

           आज भारतातील 'स्त्री ' जर राष्ट्रपती बनून देश बघते , एक स्त्री बुलेट ट्रेन चालवते , मग गणपती मंडळ का नाही ? एक संधी तर देऊन बघा , बदल आपोआप जाणवेल कारण हि तर 'स्त्रीयांची ' इच्छा आहे   . दुसऱ्याकडे बघण्याआधी सुरुवात स्वतःपासून करा . स्वतः टिळकांनी देखील ' आधी केले मग सांगितले ' .  

Sunday 23 April 2017

वाढती यांत्रिकता कितपत योग्य ?

               साधारण ४-५ दिवसांपूर्वीची घटना असेल . बर्याच दिवसांनी मित्रांना भेटण्याचा 'योग' जुळून आला होता . एका मॉलमध्ये एकत्र जमलो . गप्पांच्या ओघात वेळ कसा चालला होता तेही कळत नव्हतं . आम्ही वरच्या मजल्यावर बसलो होतो . अचानक ओरडण्याचा आवाज आला . तोच सरशी सगळे उठून  काय झाले ते बघायला गेले . (मॉल मध्ये 'मध्यवर्ती ' भाग हा सहसा पूर्णपणे मोकळा असतो . ) ५ मिनिटे खाली वाकून पाहिल्यावर समजले - एका लहान मुलाचे हाताचे बोट " यांत्रिक जिन्यात " - एस्कलेटर मध्ये अडकले .

              जिवाच्या आकांताने तो कळवळत होता . त्याची आई त्याला कवटाळून होती . त्या क्षणाला कोणीही मदतीला गेले नाही मात्र पटापट 'स्मार्ट फोन' वर चित्रित करणे सुरु झाले . इतकी तर आजकालच्या माणसाची माणुसकी उरलीये . स्मार्टफोन वापरता वापरता माणसाचा स्वतःचा स्मार्टनेस मात्र कधीच हरवलाय .'सोशल ' मीडियावर फोटो अपलोड / शेयर  करून दुःख 'सोसणाऱ्याच्या ' वेदना कधीच  कमी नाही होत ,उलटे त्याचे फक्त 'शोषणच' होते   . महत्त्वाचं फक्त ,त्यांनी  फिरणाऱ्या जिन्याची मोटार मात्र लगेच बंद केली . पण तेवढ्याने त्याच्या वेदना थांबल्या  नाहीतच . २० मिनिटे त्याचा हात तसाच होता ,तेव्हा कुठे ऑपरेटर आला अन त्याने हात मोकळा केला .

               मानवी आयुष्य सुलभ व्हावे यासाठीच खरे तर यंत्रांचा शोध लागला .अन कालानुरूप त्याचा वापर वाढता  झाला . पण वाढती यांत्रिकता कितपत योग्य आहे ? याचा मात्र विचार करायला हवाच . झालेल्या घटनेत मुलाला दोष देणे बिलकुल चुकीचे आहे . मस्ती करणं , उड्या  मारणं हा लहान मुलांचा गुणधर्मच . पण पालकांना मात्र कळायला हवे , मुलांना खेळायला , बागडायला उद्यानात न्यावे न कि  मॉल मध्ये 'प्ले -स्टेशन 'वर .

          धावपळ करण्याच्या नादात माणसाने कृत्रीमपणा  अन यांत्रिकता निवडली . पण त्यांच्यामुळे उद्भवणाऱ्या गोष्टींचा उपाय फक्त अखंड निसर्गात आहे. २०व्या मजल्यावर घर - मग खाली उतरण्यासाठी लिफ्ट - पार्किंगहुन एसी कार मधून मॉल मध्ये यायचं अन इकडे पुन्हा एस्कलेटर. कुठे कुठे जरा चालणे नको . अन मग ह्या साऱ्या गोष्टींमुळेच रक्तदाबाचा त्रास सुरु झाल्यावर , व्यायाम करायला महागडी 'ट्रेडमिल ' घरात आणून ठेवणार . फक्त यासाठीच मेहनत करून पैसे कमवायचेत का ? यातली आर्धी यांत्रिकता जरी टाळली तरी ट्रेडमिल चा खर्च देखील वाचेल अन आयुष्य पण सुरळीत असेल . याचा कुठेतरी प्रत्येकानेच विचार करायला हवा !!

Wednesday 8 March 2017

'प्रतिज्ञा'

अगदी परवाचीच गोष्ट . संध्याकाळी चहा घेण्यास बाहेर निघालो . हातात सवयीप्रमाणे मोबाईल. २१व्या शतकात मानवाच्या मूलभूत गरजा वाढल्या आहेत. तुम्हा-आम्हा सर्वसामान्याच्या हातात अगदी सहजपणे आढळतो . फक्त कोण त्याचा कसा वापर करून घेतो यावर ते अवलंबून असतं . (अर्थात मोबाईल शाप कि वरदान हा खूप मोठा विषय  आहे ,त्यावर आज भाष्य नाही . )
चालत असतानाच मला कोणीतरी पाठी मागून आवाज दिला "ए दादा थांब ". अन एक मोपेड माझ्या बाजूला येऊन थांबली . साधारण तिशीतली एक महिला होती. सुरुवातीला मला समजले नाही . पण नंतर उमगले माझ्या हातातला मोबाईल पाहून त्यांनी मला थांबवलं . त्यांनी सुद्धा त्यांचा मोबाईल हातात घेत माझ्यापुढे केला . हे सारं  घडत असतानाच मी त्यांच्याकडे पाहत होतो .( वस्तुतः आपल्या तथाकथित पुढारलेल्या समाजानेच तसले 'संकेत ' पाडले आहेत . कपाळावर कुंकू किंवा टिकली नाही म्हणजे -वैधव्य . )
एकंदरीत त्यांचा संसाराचा गाडा त्या एकट्याच हाकत होत्या . त्यांनी मला त्यांचा मोबाईल देत विचारलं . "कसलं तरी 'अकाउंट' येतय बघ यात. त्यामुळे माझं इंटरनेट चालू नाही होतेय अन मला व्हिडिओ बघता नाही येत
". मी मोबाईल हातात घेताच मला लक्षात आलं  होतं  काय झालय ते. अन लगेच इंटरनेट चालू देखील केलं. त्या लागलीच  'थँक्स ' म्हणाल्या .त्या पुढे बोलल्यात कि मला ब्लॉऊजच्या  वेग-वेगळ्या   डीझाईन   बघायला लागतात . आता मात्र सारं  चित्र स्पष्ट झालं  होतं .
अकाली वैधव्य पदरी पडले म्हणून निराश न होता  किंवा केवळ रडत न बसता 'ती ' उभी राहिली . तिच्या स्वताच्या पायावर . अन मी  मनात हा विचार करत असतानाच नकळतपणे '  नतमस्तक ' झालो . अर्थात आज महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर खूप सार्या यशस्वी स्त्रियांबद्दल बोललं जाईल त्यांचं कौतुक होईल . पण समाजात 'तिच्या'सारख्या खूप सार्या स्त्रिया आहेत .  योग्य पाठींबा न मिळाल्यामुळे मागे राहतात .
जर खरंच तुम्हाला 'महिला दिन ' साजरा करायचा असेल तर ज्या स्त्रिया केवळ साथ न मिळाल्यामुळे अन मार्गदर्शन न भेटल्यामुळे मागे राहतात त्यांना केलेली मदत खूप लाखमोलाची ठरेल .

दुनिया टपली आहे  संपवण्यास तुला
तेव्हा खचू नकोस
अन्यायाविरुद्ध लढा दे तू

एका ठिणगीची मशाल हो तू
जीवन सर्वांचे उज्ज्वल करण्या

येति अखंड संकटे तुझ्या वाटी
घे हाती समशेर
दैत्याचा वध  करण्या

शिक्षणाचा वसा घे हाती
ज्ञान सर्वांना  वाटण्या

उभी राहा स्वताच्या  पायी
हे सारे विश्व तारण्या

तुझ्याविन जग नाही हीच आजची 'प्रतिज्ञा' 

Wednesday 18 January 2017

दिवार - ए - इन्सानियत

 माणुसकीची भिंत

दरवर्षीप्रमाणे ह्या वेळेसही थंडीचा तडाखा कायम आहे. हिवाळा सरत आला , नुकताच सूर्याने मकर राशीत देखील प्रवेश केलाय . पण हा हिवाळा मात्र थोडा वेगळा आहे . कामानिमित्त माझे नाशिक ,पुणे  इथे चक्कर झालेत अन घरी मालेगावी सुद्धा . ह्या सर्व ठिकाणी मला एक गोष्ट आढळली ,जी तुम्हीसुद्धा नक्कीच पाहिली असणार - "माणुसकीची भिंत "

जे नको असेल ते ठेवून जा अन जे हवे असेल ते घेऊन जा . असा संदेश देणारी . फूटपाथवर झोपणाऱ्याना किंवा गरीब लोकांना कि ज्यांना एकावेळेच्या जेवणाची भ्रांत असते त्यांना उब देणारी . गरीब-श्रीमंतांच्या 'दरीबद्दल ' सर्वच बोलतात किंबहुना सर्वांना परिस्थिती चांगलीच ठाऊक आहे . (त्याबद्दल आत्ता  भाष्य नको. )फक्त "फॅशनच्या " नावाखाली किंवा "ट्रेंड " म्हणून दरवर्षी नव-नवीन कपडेलत्ते , स्वेटर्स  घेणारे दरीच्या उंच टोकावर आहेत . अन कुटुंबातल्या एकही सदस्याचं 'धड' धडपणे झाकण्याची ऐपत नसणारे दरीच्या पायथ्याशी . हीच मानसिकता बदलण्यासाठी नोव्हेंबर २०१६ मध्ये नागपूर येथील एका शाळेने प्रयत्न केला . अन भारतात "माणुसकीच्या भिंतीचा " पाया घातला.

नको असलेले अन जास्तीचे कपडे घरात साठवून ठेवण्यापेक्षा किंवा इतरत्र फेकण्यापेक्षा  तिथे ठेवून द्यायचे जेणेकरून ज्यांना त्याची गरज  त्यांना ते वापरात येतील. जगातील काही लोकांनी माणुसकी जरी सोडली असली म्हणून सर्वांनीच  सोडलीये असं नाही . अन म्हणूनच पाहता पाहता त्या भिंतीचा प्रसार झाला ,त्या योजनेला प्रतिसाद मिळाला . ज्ञानेश्वरांनी भिंत चालवल्याचे फक्त ऐकण्यात आहे पण आजच्या काळात हि भिंत चालवणे खूप महत्त्वाचे आहे . ह्या भिंतीची चालदेखील तितकीच क्रांतिकारी असणार आहे . आज संपूर्ण भारतात पसरलेल्या ह्या भिंतीचे मूळ पाकिस्तानात आहे . ( ज्याप्रमाणे भारतातील प्रत्येक मुसलमान हा भारतविरोधी नाहीये  त्याप्रमाणेच पाकिस्तानात देखील चांगले लोकं आहेत !)

रोहयाल वरिंद नावाच्या एका मुलाने वयाच्या १५व्या वर्षी हि कल्पना आमलात आणली . कपडे ,औषध-गोळ्या , जेवणाची सोय ह्या सर्व गोष्टी त्याच्या डोक्यात होत्या. पाकिस्तानातील फैसलाबाद येथे फेब्रुवारी २०१६ मध्ये त्याची सुरुवात झाली . अन आज त्याच्या ह्या छोट्याश्या कल्पनेला जागतिक स्वरूप प्राप्त झालय .तात्पर्य एकच , कुठल्याही गोष्टीची सुरुवात हि स्वतःपासून करावी लागते ,त्यानंतर तिचं  स्वरूप नक्कीच विस्तृत होणार .
भारतात सुरु झालेली हि भिंत फक्त हिवाळ्यासाठीच मर्यादित न राहता ती इतर सोयींसाठी देखील आमलात
आणायला हवी .

(हा लेख वाचणाऱ्यांना माझं एकच आवाहन आहे , जर तुमच्या परिसरात हि भिंत नसेल तर स्वतः पुढाकार घेऊन तुम्हीदेखील ती उभी करू शकता . )