तंबाखू - एक स्लो पॉइसॉन
आज जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे . एक जवळून पाहिलेला अनुभव आठवला , आणि सहजच इंटरनेट वर नजर फिरवून त्याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला .
भारतातील प्राचीन साहित्यांमध्ये तंबाखूचे 'तमाखू' असे वर्णन करण्यात आले आहे. संस्कृत आणि इतर काही प्रादेशिक भाषेतील साहित्यांमध्ये तंबाखूचे सतराव्या शतकापूर्वीचे दाखले मिळतात . काही इतिहासकारांच्या मते सतराव्या शतकाच्या सुरुवातीस तंबाखूची वनस्पती अमेरिकेतून भारतात स्थलांतरित झाली . भारतामध्ये गांज्याचा वापर इसवीसनपूर्व २००० पासून असून त्याचा सर्वप्रथम उल्लेख अथर्ववेदामध्ये करण्यात आला आहे , प्राचीन काली तंबाखूचा उपयोग आशीर्वाद आणि आरोग्य या दोन्हीसाठी ;केला गेला होता . तसेच पाहुण्यांचे स्वागत करतानाही तंबाखू भेट म्हणून दिली जात असे .
इतिहासावर नजर फिरवता असे लक्षात येते कि प्राचीन काळापासून त्याचे सेवन केले जातेय. पण आजच्या काळात त्याचे सेवन करण्याचा अतिरेक होतोय . कर्करोगासारख्या दुर्धर आजाराला तंबाखू सोबत जोडले जाते .ह्याच निमित्त एक अनुभव सांगावासा वाटतोय. तसा तो छोटासा इतरांसाठी असेलही पण ज्या कुटुंबावर दुःख बेतलंय त्यांच्यासाठी नक्कीच नाही. वडिलांचे मित्र होते , नारायण काका . स्वभाव खूपच मनमिळावू . सर्वांशी प्रेमाने बोलणारे , सर्वाना विचारणारे . शाळेतील ते लोकप्रिय शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये ओळखले जायचे .
इतकं सर्व छान असून सुद्धा काकांना एक सवय होती , सिगारेट ओढण्याची . अन त्या सवयीनेच त्यांच्यावर काळावर झडप घातली . वरती नमूद केल्याप्रमाणेच अगदी छोटी गोष्ट होती . त्यांच्या कॉलेजच्या वार्षिक समारंभामध्ये कसलं तरी नाटक होतं . अन त्यात त्यांना एका मवाल्याचा रोल करायचा होता. आता अभिनय जिवंत वाटावा म्हणूनच कि काय त्यांनी सिगारेट हातात घेऊन ते करण्याचा ठरवलं आणि आयुष्यातील पहिल्यांदा धूम्रपान केले . पण त्यांना त्यावेळी पुसटशीही कल्पना नव्हती कि जिवंत अभिनय साकारण्यासाठी केलेला त्यांचा प्रयत्न त्यांच्या खऱ्या आयुष्यातील अभिनय संपवेल . साधारण वयाच्या पन्नाशीत असताना त्यांना तोंडाच्या कर्करोगाने ग्रासले . जेव्हा ते उपचार करायला गेले तेव्हा वेळ बरीच पुढे निघून गेली होती . मी मागे देखील एका लेखात लिहिले होते - त्यांच्या जाण्याने जगाच्या लोकसंख्येत काही फरक जाणवणार नाही , पण ज्यांच्यासाठी ते 'जग ' होते अश्या त्यांच्या कुटुंबाच मात्र आज छत्र हरपलंय .
माणसाने व्यसन का करावं , किती करावं , त्याच्या किती आहारी जावं ? हा मात्र आता नक्कीच विचार करण्याचा मुद्दा बनलाय . आज जग कोरोना महामारीच्या विळख्यात अडकलय , तो झपाट्याने पसरतोय आणि मारतोय . पण जे तंबाखूचे व्यसन आहे ते वर्षानुवर्षे रोज हळूहळू मारतंय. दोघांमध्ये फरक काय तो फक्त वेळेचाच . ह्याचा पण तितक्याच गांभीर्याने विचार करायला हवाय . खासकरून कुमारवयीन , कॉलेजला जाणारे तरुणवर्गाने , ज्यांचा कल वाईट वळणाकडे लगेच झुकतो . उपरोधिकपणे असेही बोलले जाते - जगात रोज हजारो माणसे सिगारेट सोडतात . . . . . . . . . . मृत्यूमुळे !
तंबाखूच्या आहारी इतके पण जाऊ नका
कि तुम्ही तिच्यामुळे मृत्यूच्या आहारी जाल .
तुम्ही सिगारेट संपवताय कि
सिगारेट तुमचं आयुष्य ?
वेळीच फरक ओळखा !
( ता. क. - हातात सिगारेट घेण्यापेक्षा पेन घेतलेला कधीही उत्तमच ! )