Tuesday, 30 June 2020

विठू माऊली


            आज आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चैतन्याचे वातावरण आहे , जरी दर वर्षीप्रमाणे पायी वारी जात नाहीये . कालपासूनच सर्वांच्या व्हाट्सएप स्टेटसला लालपरी झळकत आहे जी ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका घेऊन जात आहे . पंढरपूरची  वारी हा तसा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे . परदेशी संशोधक सुद्धा वारीचा अभ्यास करून गेले . मोठमोठे प्रबंध लिहिले गेलेत वारीवर . वारीतील शिस्तबद्धता , त्यातील नियोजन हे सारं नक्कीच आश्चर्यकारक आहे . 

             मात्र आज मी ज्या विठू माऊली बद्दल लिहितोय ती घरातील  आहे . माझे आजोबा , आईचे वडील कै . विठ्ठलराव माधवराव  पवार . आज ते ह्या ( स्वार्थी ) जगात हयात नाहीत . पण त्यांनी दिलेली शिकवण , त्यांच्या  आठवणी आजही तितक्याच ताज्या आहेत. तसं त्यांचं अन वारीचं खूप घट्ट नातं होतं . ऐन तारुण्यात त्यांनी पंढरपूरची वारीची परंपरा सुरु केली होती . ती शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी जपली . जवळजवळ 45 वर्षे त्यांनी नित्यनेमाने वारी केली . अन मी स्वतःला तितका  भाग्यवान समजतो  कि मला त्यांचा सहवास लाभला होता . मी पंढरपूरला क्वचितच एकदा गेलेलो , ते सुद्धा सहल म्हणून . पण मला त्याचं कधी दुःख वाटलं नाही . कारण मी जिवंत विठू माऊली चे दर्शन घेत होतो माझ्या आजोबांच्या रूपात . 
             
            त्यांचं संपूर्ण आयुष्यच एक आदर्श होतं . लोकसेवेला  वाहून दिलेलं . साधारण 80 च्या दशकापासून ते गावचे सरपंच म्हणून 15 वर्षे बिनविरोध निवडून आले होते इतकी त्यांची लोकप्रियता होती . गावातील मुलांना शाळेसाठी दुसऱ्या गावात जावं लागायचं , त्यांनी ती अडचण बघून गावात शाळा देखील उघडली त्यांच्या वडिलांच्या नावाने . घरातील मोठा मुलगा  म्हणून त्यांनीच सर्वांचं पाहिलं . पण मोठे  असल्याचा कधी काडीमात्र  गर्व केला नाही . एकत्रित  कुटुंबाचा संसाराचा गाडा ओढताना किंवा संपूर्ण गावचा कारभार सांभाळताना त्यांनी रोजचा हरिपाठ कधी चुकवला नाही . त्यांच्या पांडुरंगाच्या भक्तीत श्रद्धा होती , अंधश्रद्धा मात्र कधी दिसली नाही . विज्ञानाची कास धरूनच ते चालत . ज्ञानेश्वर माऊली , तुकाराम महाराज , सावता माळी ह्या संतांनी दिलेल्या शिकवणी प्रमाणेच त्यांनी आधी स्वतःच्या कामात , शेतीत पांडुरंग पाहिला  . वर्षभर अविरत न थकता ते  काम करायचे अन मग आषाढी -कार्तिकी एकादशीला वारी करून विठ्ठलाच्या दर्शनाला जायचे . 

             वयाच्या साठीत  सुद्धा वारी करून ते आल्यावर  आम्ही त्यांना भेटायला जायचो ,त्यांच्या  चेहऱ्यावर  प्रचंड उत्साह ओसंडून वाहायचा . वारी करून आल्याचा त्यांचा थकवा आम्हाला तिळमात्र जाणवत नसायचा . खरे तर शाळेत सर्वच गोष्टी कधीच शिकवल्या जाऊ शकत नाहीत . संस्कारांचे मोती हे घरातूनच एका पिढी मार्फत दुसऱ्या पिढीला दिले जातात . आजही आजोबांनी आम्हाला दिलेली शिकवण हि आयुष्य जगण्यात कामी  येतेय . त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दर वर्षी गावावरून जाणाऱ्या दिंडीला अन्नदान केले जाते . मला त्यांच्यावर लिहिण्यासाठी एक  पुस्तक कमी पडावे असे त्यांचे आयुष्य होते , इतरांसाठी वाहिलेले . चंदनासारखे स्वतः झिजून इतरांना सुगंधित करणारे . 

           आज त्यांच्यावर थोडक्यात लिहिण्याचा एकच उद्देश होता , जसं  मला माझ्या आजोबांमध्ये विठू माऊली  दिसली , तसेच आपल्या इतरांच्या आयुष्यात देखील  अशाच विठू माऊली आहेत . त्या सर्वांच्याच घरात असतात खासकरून आजी-आजोबांच्या रूपात . तर त्यांना आपण जपलं पाहिजे , त्यांचा आयुष्य जगण्याचा अनुभव दांडगा आहे आणि तोच अनुभव आपल्याला आयुष्याची शिदोरी म्हणून वापरायचा आहे .

          साधं उदाहरण आहे , लॉकडाउन मुळे घरात बसून सर्वच जण कंटाळलेले असणार , तेच तेच सिनेमे , सिरीयल पुनः प्रसारित बघून . पण ज्यांच्या घरात आजही आजी-आजोबा आहेत त्यांना मात्र हे कधीच कंटाळवाणं वाटलं नसणार . एकत्र कुटुंब असलेल्याना त्याचा  चांगला अनुभव येतो . 

            कोरोनामुळे देवळातील माऊली  भेटली नाही म्हणून काय होतं  , घरातील माऊली चा आशीर्वाद घ्या , त्यांना प्रेम द्या  . 'तो' नक्कीच  कंबरेवर हात ठेवून बघतोय तुमच्याकडे !

Sunday, 14 June 2020

विसंवादाचा विपर्यास

             अशा खूप कमी घटना आहेत ज्यांनी मला रात्र-रात्रभर जागं ठेवलंय . कालची रात्र देखील त्यातलीच एक होती . डोळ्याला डोळा लागतच नव्हता . निसर्ग वादळ कधीच येऊन गेलं देखील , पण डोक्यात  रात्रभर विचारांचे वादळे चालूच . न राहवून लिहायला घेतलं , अन भराभरा ओतून मोकळं केल्यागत ठेवलं. विचार केला , मी जसं लिहून  होतो , मनातील भाव मोकळे करतो . चित्रकार कुंचल्यातून व्यक्त  होऊन भाव मोकळे करतो . गायक कंठातून गावून व्यक्त होऊन भाव मोकळे करतो . प्रत्येकाच्या छंदा / आवडीनुसार व्यक्त होणे वेगळे , व्यक्त होण्याचे  माध्यम देखील वेगळे .पण त्याही  पलीकडे विचार येतो , सर्वांना हे खरंच शक्य होते का ? व्यक्त होणे , दुसऱ्याला आपलं मन मोकळं करून दाखवणे ? 

               माणसाने आज चंद्रावर , मंगळावर याने पाठवलीत , दुसर्या आकाशगंगेत याने गेलीत , त्यांची छायाचित्रे घेणे शक्य झाले .  पृथ्वी बाहेरील अथांग जग देखील पालथं घालण्याचा प्रयत्न चालू आहे . हे   सर्व  बाह्य जगत झालं . पण स्वतःच्या मनात किती खोलवर जाऊ शकला माणूस ? त्याचा थांग लागला कोणाला आजवर ?? बघायला गेलं तर किती छोटीशी गोष्ट आहे मन. अगदीच खोलात मलाही जाणे शक्य नाही . पण इंटरनेट च्या महाजालात जे माहिती स्रोत म्हणून सर्वमान्य आहे - विकिपीडिया , त्यावर जाऊन थोडी माहिती जमा करण्याचा प्रयत्न केला . पहिल्याच वाक्याला त्यांनी एक टीप दिलीये - 'या माहितीची सत्यता पडताळण्यासाठी अतिरिक्त उध्द्वरणांची आवशक्यता आहे'. (This article needs additional citations for verification). म्हणजे त्यावर जे लिखाण झालंय , त्याबद्दल अजूनही पूर्णत्त्व प्राप्त झालेलं नाही . 
ते ज्या शक्यते पर्यंत पोहोचले ते खालीलप्रमाणे आहेत . 
१. मन आणि मेंदू हे दोन्हीही वेगळे आहेत (Dualism) . 
२. मानसिक घटना आणि मेंदूतील घडणाऱ्या गोष्टी ह्या सारख्याच आहेत (Materialism) . 
३. फक्त मानसिक घटनाच अस्तित्त्वात आहेत (Idealism). 

               मेंदू हा एक शरीराचा भाग / अवयव आहे , तर मन केवळ असंख्य विचारांचे भांडे म्हणू शकतो . थोडक्यात मन हे एक असे क्षेत्र आहे , ज्यात स्वतःशिवाय इतर कोणालाही प्रवेश नाही . वरील गोष्टी सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे , कि तुम्ही बाहेरून ओळखू नाही शकत , समोरील  व्यक्तीच्या मनात काय चाललंय . पण इतर प्राण्यांपेक्षा माणसाला एक गोष्ट जास्त अवगत आहे . ती म्हणजे विचार करण्याची . प्राण्यांना फक्त मेंदू आहे ते विचार नाही करू शकत . माणसाला आसपासच्या घटना काय आहेत त्यावर विचार करता येतो , वैज्ञानीक तर्क नाहीये ह्या गोष्टीला पण माणसाला हे अवगत आहे . ( खरेतर मन अगदी कुठे आहे हेच ठामपणे अजून कळलेलं नाहीये माणसाला ). हि झाली मनाची शास्त्रीय गोष्ट . आता खऱ्या गोष्टीकडे वळूयात . जर कोणी सांगायला असमर्थ आहे , त्याच्या मनात काय चाललंय , व्यक्त होऊ शकत नाही . किंवा व्यक्त झाल्यावर लोकं मला काय म्हणतील ? , माझ्या बद्दल काय विचार करतील ? , मला अयशस्वी ठरवतील का ? मी चुकलो का ? ह्यासारख्याच असंख्य विचारांचे काहूर माजत असल्यामुळे कदाचित व्यक्त होणे अवघड होऊन बसले आहे . पण हे सर्व बदलण्याची खरंच गरज आहे . 

ह्याला दोन्ही बाजू आहेत . 
१. एक तर सर्व मनात साचवून ठेवलं तर त्याचा उद्रेक होऊन आत्महत्येसारखं चुकीचं पाऊल उचलले जाऊ शकते . आधी सुद्धा एका लेखात म्हटले आहेच मी. आत्महत्या हा उपाय कधीच नव्हता , नाहीये आणि नसेलही . तुमच्या जाण्याने जगाला काडीमात्र फरक पडणार नसतो , पण तुम्ही ज्यांच्यासाठी जग आहात त्यांना मात्र फार फरक पडतो तुमच्या जाण्याने . 
२. पण खरंच त्याच्याही पलीकडे विचार केला असता असे जाणवते , का कोणी इतका टोकाच्या भूमिकेला जावं ? त्याला जे मानसिक समाधान /मन : शांती हवीये ती खरच मिळतेय का ? अर्थात ह्या सर्वांचा भौतिक सुखासोबत संबंध जोडणे देखील योग्य नाही . ज्यांचं जगात नाव झालाय , प्रसिद्धी आहे , पैसा आहे ती व्यक्तीदेखील असे पाऊल  उचलताय . हि खरोखरीच  धोक्याची घंटा आहे मानवासाठी . 

                समोरच्या माणसाचं असणं महत्त्वाचं आहे ना कि त्याच्या समस्या , ज्यामुळे तो मानसिक त्रासात आहे . आज माणसामध्ये असलेला विसंवाद ह्याला काही अंशी कारणीभूत आहे . त्यावर काम करणे गरजेचे आहे . स्वतःचा अहंकार समोरच्या व्यक्तीपेक्षा मोठा कधीच नसावा . आभासी जगात , सोशल मीडियावर तुमचे लाखो - करोडो मित्र /फॉलोवर्स असतील , पण तुमच्यासोबत तुमचं ऐकणारा आपला व्यक्ती नसेल तर तुमचं आणि तुमच्या जवळच्या व्यक्ती दोघांचंही चुकतंय . दोघांनी स्वतःच्या भूमिका नीटपणे निभावल्या पाहिजेत . स्वतः कधी टोकाचा विचार करायचा नाही , आणि दुसरा करतोय किंवा एकटा पडतोय , तर त्याला अजून दूर ढकलणे योग्य नाही . कारण व्यक्ती निघून गेल्यावरच जास्त आठवणी काढल्या जातात . मग जिवंत असतानाच का काळजी घेतली जात नाही ? समोरच्या व्यक्तीसोबतचा संवाद तुमच्यासाठी नसेलही तितकासा महत्त्वाचा , पण समोरील व्यक्तीसाठी नक्कीच आहे . ज्या क्षणाला समोरच्याचे बोलणे हे तुम्हाला रडगाणे वाटू लागते , तो हाच क्षण असतो का , जेव्हा तुम्ही समोरचा माणूस आणि त्याच्यासोबतचं नातं दोन्ही गमावता ? व्यक्ती आणि नातं गमावल्यानंतर रडगाणे करण्यापेक्षा त्याचे रडगाणे ऐकून घेणं कधीही योग्यच नाही का ?

              काल झालेल्या घटनेमुळे पुढील काही दिवस खूप सारे मानसोपचार तज्ञ्  जन्म घेतील . आपल्याला त्यात देखील जाऊन काही जटिल (Complex) करायचं  नाही . साधं , सरळ अन सोप्प , आपल्या माणसांची काळजी घ्या त्यांच्याशी व्यक्त व्हा , त्यांना सुद्धा बोलते करा. कदाचित उद्या तुम्ही देखील आजूबाजूला माणसांची गर्दी असून एकटे व्हाल .

विसंवादाचा विपर्यास करू नका ! सुसंवाद ठेवा !!

Saturday, 30 May 2020

तंबाखू - एक स्लो पॉइसॉन

तंबाखू  - एक स्लो पॉइसॉन 
             आज जागतिक तंबाखू  विरोधी दिन आहे . एक जवळून पाहिलेला अनुभव आठवला , आणि  सहजच इंटरनेट वर नजर फिरवून त्याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला . 
             भारतातील प्राचीन साहित्यांमध्ये तंबाखूचे  'तमाखू' असे वर्णन करण्यात आले आहे. संस्कृत आणि इतर काही प्रादेशिक भाषेतील साहित्यांमध्ये तंबाखूचे सतराव्या शतकापूर्वीचे दाखले मिळतात . काही इतिहासकारांच्या मते सतराव्या शतकाच्या सुरुवातीस तंबाखूची वनस्पती अमेरिकेतून भारतात स्थलांतरित झाली . भारतामध्ये गांज्याचा वापर इसवीसनपूर्व २००० पासून असून त्याचा सर्वप्रथम उल्लेख अथर्ववेदामध्ये करण्यात आला आहे , प्राचीन काली तंबाखूचा उपयोग आशीर्वाद आणि आरोग्य या दोन्हीसाठी ;केला गेला होता . तसेच पाहुण्यांचे स्वागत करतानाही तंबाखू भेट म्हणून दिली जात असे . 
             इतिहासावर नजर फिरवता असे लक्षात येते कि प्राचीन काळापासून त्याचे सेवन केले जातेय. पण आजच्या काळात त्याचे सेवन करण्याचा अतिरेक होतोय . कर्करोगासारख्या दुर्धर आजाराला तंबाखू सोबत जोडले जाते .ह्याच निमित्त एक अनुभव सांगावासा वाटतोय. तसा  तो छोटासा इतरांसाठी असेलही पण ज्या कुटुंबावर दुःख बेतलंय त्यांच्यासाठी नक्कीच नाही. वडिलांचे मित्र होते , नारायण काका . स्वभाव खूपच मनमिळावू . सर्वांशी प्रेमाने बोलणारे , सर्वाना विचारणारे . शाळेतील ते लोकप्रिय शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये ओळखले जायचे . 
               इतकं सर्व छान असून सुद्धा काकांना एक सवय होती , सिगारेट ओढण्याची . अन त्या सवयीनेच त्यांच्यावर काळावर झडप घातली . वरती नमूद केल्याप्रमाणेच अगदी छोटी गोष्ट होती . त्यांच्या कॉलेजच्या वार्षिक समारंभामध्ये कसलं तरी नाटक होतं . अन त्यात त्यांना एका मवाल्याचा रोल करायचा होता. आता अभिनय जिवंत वाटावा म्हणूनच कि काय त्यांनी सिगारेट हातात घेऊन ते करण्याचा ठरवलं आणि आयुष्यातील पहिल्यांदा धूम्रपान केले . पण त्यांना त्यावेळी पुसटशीही कल्पना नव्हती कि जिवंत अभिनय साकारण्यासाठी केलेला त्यांचा प्रयत्न त्यांच्या खऱ्या आयुष्यातील अभिनय संपवेल . साधारण वयाच्या पन्नाशीत असताना त्यांना तोंडाच्या कर्करोगाने ग्रासले . जेव्हा ते उपचार करायला गेले तेव्हा वेळ बरीच पुढे निघून गेली होती . मी मागे देखील एका लेखात लिहिले होते -  त्यांच्या जाण्याने जगाच्या लोकसंख्येत काही फरक जाणवणार नाही , पण ज्यांच्यासाठी ते 'जग ' होते अश्या त्यांच्या कुटुंबाच  मात्र आज छत्र  हरपलंय . 
             माणसाने व्यसन का करावं , किती करावं , त्याच्या किती आहारी जावं ? हा मात्र आता नक्कीच विचार करण्याचा मुद्दा बनलाय . आज जग कोरोना महामारीच्या  विळख्यात  अडकलय , तो झपाट्याने पसरतोय आणि मारतोय . पण जे तंबाखूचे व्यसन आहे ते वर्षानुवर्षे रोज हळूहळू मारतंय. दोघांमध्ये फरक काय तो फक्त वेळेचाच . ह्याचा पण तितक्याच गांभीर्याने विचार करायला हवाय . खासकरून कुमारवयीन , कॉलेजला जाणारे तरुणवर्गाने , ज्यांचा कल  वाईट वळणाकडे लगेच झुकतो . उपरोधिकपणे असेही बोलले जाते - जगात रोज हजारो माणसे सिगारेट सोडतात  . . . . . . . . . . मृत्यूमुळे  !

            तंबाखूच्या आहारी इतके पण जाऊ नका
            कि तुम्ही तिच्यामुळे मृत्यूच्या आहारी जाल .
           
            तुम्ही सिगारेट संपवताय कि
            सिगारेट तुमचं आयुष्य ?
            वेळीच फरक ओळखा !

( ता. क. - हातात सिगारेट घेण्यापेक्षा पेन घेतलेला कधीही उत्तमच  ! )

Tuesday, 10 March 2020

अप - स्पर्श

अप - स्पर्श

               परवाच  जागतिक महिला दिन मोठया  दिमाखात पार पडला . सर्वीकडे महिलांच कौतुक करण्यात आलं , अन एक दिवसाचा सोहळा संपन्न झाला .
               मी कामानिमित्त काही दिवस समीरवाडी  , कर्नाटक येथे होतो . काल संध्याकाळी तेथून निघणे झाले . कोल्हापूर साठी शेवटची बस होती ६ वाजता . त्यामुळे तुंबळ गर्दी झाली होती बसमध्ये . तिकडे कर्नाटक मध्ये अजून सुद्धा ३x २ च्या आसन व्यवस्थ्येच्या बस आहेत , तरीसुद्धा बरेच लोकं  उभी होती. नशिबात असल्यामुळे मला खिडकी जवळील सीट भेटली ( खूप कमी फळफळतं  माझं नशीब ). आणि बाजूला एक मुलगी बसली . बहुदा कॉलेज जाणारी असावी , युनिफॉर्म होता . अन तसल्याच युनिफॉर्म मध्ये अजून काही मुले देखील होती . खूपच गर्दी असल्यामुळे बसायला मिळालं  नव्हतं  त्या मुलांना . पण बस पुढे जाताच त्या मुलीला अस्वस्थ वाटू लागलं , मला ते लगेच जाणवला म्हणून मी खिडकी जवळ सरकलो , तशी लागलीच तीपण सरकली . अन बाजूला उभा असलेला मुलगा देखील ....
               आता मला तिची अस्वस्थता समजायला उशीर नव्हता लागला . मी त्या मुलाकडे एक कटाक्ष टाकला , त्यानेही माझ्याकडे पहिला . पण त्याच्या डोक्यात तेव्हा भलतेच विचार होते . बस जशी चालताना धक्के घेत चालत होती , तसे तोही बस मुळेच धक्के घेत शरीर हलवत होता , जणू काही तो जाणून बुजून काहीच करत नव्हता  , अन ते सर्व आपोआप घडत होत.
              त्या मुलीला अप-स्पर्श करण्याचा त्याचा प्रयत्न केव्हापासून चालूच होता . एव्हाना मी कानडी नाही हे त्या मुलीच्या लक्षात आलं असावं , म्ह्णून ती मला देखील काही बोलली नाही . अन मी देखील त्या मुलाला इच्छा असून काही बोलू शकलो नव्हतो . मी बोललेलं मराठी / हिंदी त्याने  समजून  न समजल्यासारखं केल असतं .
मग मी त्या मुलीलाच माझ्या जागेवर बसण्याचं इशार्याने सांगितलं . तस ती खिडकी जवळ बसली अन मी तिच्या जागेवर . तिच्या चेहऱयावर विलक्षण सुटकेचा एक निश्वास दिसत होता , तर त्या मुलाला देखील समजलं होत मी काय  अन का केलाय ते !
               शेवटी त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता . अन नंतर माझ्या असे लक्षात आले , कि रस्त्यात बरेच खड्डे , गतिरोधक असताना देखील त्या मुलाचा मला स्पर्श देखील झाला नाही ... आश्चर्य कारक .
त्या घटनेत माझा एक प्रयत्न होता कि त्या मुलीला जो काही अप-स्पर्श होत होता , तो रोखला गेला पाहिजे . अन मला त्याच समाधान होत कि तो यशस्वी झाला होता . नुसता एक दिवस महिला दिन साजरा करून पुरे आहे का ? स्त्रिया ह्या रोज सन्मानास पात्र नाहीत का ? मला जो अनुभव आला तसा  अप-स्पर्श दररोज कोणीतरी अनुभवत असणार आहे . पण त्यातून त्यांची सुटका होते का ? किंवा हाच अप-स्पर्श वाढत जाऊन पुढे नको त्या घटना घडण्यास कारणीभूत ठरतो .
                सध्या ह्या विषयावर खूप आहे बोलायला , लिहायला पण इतकाच मांडता येईल , जे काही वर्षांपूर्वी 'निर्भया ' हत्याकांड झालं होतं  किंवा ' हिंगणघाट ' येथे झालेली घटना खूप क्रूर होती . जितका दोषी क्रूर कर्म करणारा आहे तितकाच दोषी त्या गुन्हेगाराला  पाठीशी  घालणारा नाहीये का ?किंवा तितकाच दोषी , समोर घटना घडत असताना देखील फक्त बघ्याची भूमिका घेणारा नाहीये का ? आजकाल घटना घडल्यानंतर तिचा व्हिडीओ व्हायरल करण्यात धन्यता  मानणारी लोक जास्त दिसताय . किंवा गुन्हा सिद्ध होऊन देखील कायद्याच्या पळवाटा शोधून त्यांना फक्त काही पैस्यां करीता    वाचवणारी मानसिकता आहे .
हे कुठेतरी थांबायला हवं किंबहुना थांबवायला हवं ... नाहीतर रोज कोणीतरी असा अप-स्पर्श करत राहील अन पुढे त्याच अप-स्पर्शच रूपांतर वाईट घटनेत होईल . तिथे जोपर्यन्त स्वतःच्या घरातली स्त्री नसेल तोपर्यन्त  हे असेच चालू राहणार का ???

Monday, 7 October 2019

आजचे आधुनिक सीमोल्लंघन

             उद्या दसरा आहे . परंपरेनुसार अनादी काळापासून  हा  सण / उत्सव साजरा केला जातोय . त्यातल्या दोन महत्त्वाच्या कथा , एक म्हणजे देवीचा राक्षस प्रवृत्तीवर झालेल्या विजयाचे प्रतीक तर दुसरी म्हणजे राम- रावणाचे युद्ध  ह्याच दिवशी संपन्न झाले आणि प्रभू श्रीरामांनी विजयश्री आणली. म्हणून ह्याच दिवशी भारतात सर्वत्र रावणाच्या पुतळ्याचे देखील दहन केले जाते . हि वरील आख्ययिका जवळपास  सर्वानाच ज्ञात आहेत. त्याव्यतिरिक्त अजून काही कथा आहेत त्यानुसार दसऱ्याच्या दिवसाचे महत्त्व आहे .

             पांडवांनी अज्ञातवास संपवून शक्तिपूजन शमी वृक्षाच्या ढोलीत ठेवलेली  शस्त्रे  परत घेतली आणि कौरव सैन्यावर विजय मिळवला  तो ह्याच दिवशी.
महाराष्ट्रातील वीर मावळे मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या-नाण्याच्या रूपाने संपत्ती घरी आणत .  असे हे  विजयी शिलेदार मोहिमेवरून परत आले कि दारात त्यांना घरातील स्त्रिया ओवाळीत असत . आणि त्याचेच प्रतीक म्हणून  आज  आपण  आपट्याची पाने सोने म्हणून दसऱ्याला एकमेकांना वाटून तो सोहळा साजरा करतो .
दसरा ह्या सणाला कृषीविषयक देखील महत्त्व आहे . पावसाळ्यात पेरलेले  पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत असत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या मातीवर नऊ धान्याची पेरणी करतात आणि दसऱ्याच्या दिवशी त्या धान्याचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात .  नवरात्रीत होणाऱ्या चक्रपुजा हा देखील त्याच परंपरेचा एक भाग आहे .

             अगदी माझ्या लहानपणीची गोष्ट , साधारण २००० वगेरे साली . दसऱ्याच्या दिवशी सकाळी उठून घराची साफसफाई करायची , गाडी - सायकल स्वच्छ धुवून चकाचक करायची . ( याच दिवशी पूर्वी सरदार लोक आपली शस्त्रे उपकरणे साफ करून त्यांची पूजा करीत असत . शेतकरी , कारागीर हे आपली नांगर , आऊते , हत्यारे ह्यांची पूजा करतात . ) वडिलांसोबत गावठाण जंगलात जायचं , तेव्हा प्रत्येक गावाचे असे जंगल राखलेले असायचे . काही खेड्यात अजूनही आहेत . जंगलातून आपट्याच्या झाडाची फांदी घ्यायची आणि पुन्हा घरी यायचं . दारात आई पूजेचं ताट घेऊन तयार असायची . आई ताट ओवाळायची तशी मान देखील गोल फिरवण्यात वेगळीच मज्जा होती . थोडं मोठं झाल्यावर समजलेलं त्याला "सीमोल्लंघन" म्हणत असत . आपट्याच्या फांदीची पाने लहानग्या खिश्यात कोंबायची आणि गावभर 'सोन ' वाटत हिंडायचं . सगळीकडे नव-चैतन्याचे वातावरण असायचं .

            नंतर जसजसे मोठं होत गेलो तसतसे 'पर्यावरण ' हा शब्द उमगत गेला , अभ्यासातून , वर्तमानपत्रातून ( बरं  झालं त्यावेळी  फेसबुक  किंवा व्हाट्सअँप  नव्हतं . ) खेड्यातून तालुक्याला घर बदलले . आधी सहज सीमोल्लंघन करून लुटून आणलेलं सोनं ( आपटयाची पाने ) आता बाजारातून विकत आणावं लागत असे . जणू काही आपण सोन नव्हे तर सोन विकणाराच आपल्याला  लुटतो . त्यामागची अर्थकारण आणि पर्यावरणीय कारणे देखील तशी वेगळी होती . हा सर्व बदल डोळ्यांदेखत घडत गेला . आजही त्याच बदलातून जातोय आपण . आधी गावभर  फिरून घरोघरी जाऊन सोने वाटत होतो , आता नेटभर सर्फ करून प्रत्येकाच्या वॉल /ग्रुप वर सोने उपलोड करतोय आपण . लहानपणी झाडाची एक फांदी तोडली जात होती तर दुसरी दोन झाडे लावून जगवली देखील जात होती .  आज तसं होतय  का ?  फक्त लाईक्स  आणि हॅशटॅग ट्रेंडिंग व्हावा किंवा ह्या गोष्टी सोशियल मीडिया वर पसरवल्या म्हणजे आपण 'कूल ' आहोत काळासोबत चाललोय असा गोड  गैरसमज  पसरलाय .

             अगदी जवळचेच उदाहरण आहे , मुंबईतील मेट्रो च्या  कार शेड साठी आरे  कॉलनी तील जंगलचा काही हिस्सा ग्रहण करण्यात आलाय . काल - परवा अंधारात झाडे तोडायला सुरुवात देखील झाली . खूप लोकांनी आंदोलने केली , ट्विटर , फेसबुक , व्हाट्सअँप सर्वीकडे शेयर देखील करण्यात आलं . आरे वाचवा हॅशटॅग पण ट्रेंडिंग झाला . पण 'आरे वाचवा' म्हणनाऱ्यांची 'आरोळी ' फक्त आरे पुरतीच मर्यादित हवीये का ? सर्वच बाबतीत बदल नको का घडायला ?लहान पणी जस आपण आपटयाची पाने वाटत फिरत होतो तसं  आता फिरलो तर ?
बदल फक्त इतकाच करायचंय , ह्यावेळी जिवंत झाडाची पाने न तोडता जिवंत झाडाच्या बिया वाटायच्या  !!!

           फेसबुक वर २००० मित्र आहेत , प्रत्येकाच्या वॉल वर फोटो उपलोड करण्यापेक्षा प्रत्येकाला २-२ बिया वाटल्यास नाही का घडणार बदल ? ( आरे जंगलाची किती झाडे तोडलीत , का तोडलीत , कोणाची परवानगी वगेरे  हा सर्व न्याय्य प्रविष्ठ विषय आहे , त्यात हात नको घालायला . आपण प्रत्यक्षात काय केलाय आणि काय करायला हवं हे बोललेलं कधीही योग्यच . ) सोशिअल  मीडिया वर  फक्त हॅशटॅग ट्रेंडिंग करण्यापेक्षा  प्रत्यक्ष  जीवनात आपण ह्या नवीन गोष्टी देखील ट्रेंडिंग करू शकतोय ना ? ह्या आजच्या आधुनिक सीमोल्लंघनाचा बदल घडावा हा प्रयत्न फक्त एकाने नव्हे तर सर्वांकडूनच अपेक्षित आहे . 

Saturday, 26 August 2017

हि तर 'स्त्रीयांची ' इच्छा

              दर वर्षीप्रमाणे ह्या  वर्षीसुद्धा अगदी काठावर  सुट्टी मिळाली  , गणेश चतुर्थी साठी .  १७-१८   तासांच्या  प्रवासा नंतर घरी पोहोचलो . आल्यावर लगेचच घरातल्या गणेश मूर्तीची  प्रतिष्ठापना केली . मंडळाच्या गणपतीची तयारी बघायला निघालो तर समजलं कि ह्यावेळीचा गणेशोत्सव  थोडा  वेगळा आहे . अध्यक्षांपासून  खजिनदारापर्यंत सर्व जबाबदारी महिला मंडळाने लीलया पेललीये . अगदी वर्गणी गोळा करण्यापासून सर्वच महिलांनी हिरीरीने भाग घेतला . देणगी  देणार्याला पण विश्वास होताच कि दिलेली देणगी सत्कारणी लागणार म्हणून . एरवी  घरातलं बजेट काटेकोरपणे सांभाळणाऱ्या ह्या स्त्रिया हेदेखील बजेट  सांभाळू शकतात यात तिळमात्र शंका नाही . 

            मी अगदी लहान  असल्यापासून बघत आलोय , मूर्तीची प्रतिष्ठापना असो  किंवा इतर कामे  आदी सर्व गोष्टी पुरुष मंडळी , तरुण मुले बघत असत . किंबहुना  तथाकथित पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे सर्वत्र हेच बघावयास मिळते . साहजिकच सर्व बाबतीत त्यात पुरुषांचा उजवेपणा दिसू लागतो किंवा अहम दिसतो . 
कर्कश आवाजात गाणी वाजवणे हा त्यातलाच एक प्रकार . काळाच्या ओघात सुमधुर गणपतीची गाणी , आरत्या बाजूला सारून तिथे "मुन्नी बदनाम" होत असते. वाटतच नाही गणपती बसलेत कि 'कार्य(न )कर्ते '  पार्टी करायला बसलेत .

            स्वखुशीने , यथाशक्ती वर्गणी जमा करण्याचे दिवस आता मागे पडलेत . २० - २५ कार्य(न)कर्त्यांची  'गॅंग ' घरात घुसून अपेक्षित असलेली रक्कम भेटल्याशिवाय  न सोडणारी . मूर्ती , इतर शोभीकरण , देखावे  करून उरलेले  वर्गणीचे पैसे स्टेज खालीच बसून पत्ते  खेळणे  अन तत्सम कारणांसाठी  उडवले जातात . ह्या गोष्टींची इतरांना देखील कुणकुण असते पण त्यावर भाष्य करण्यास  तयार  नसतं . कारण  मंडळ राजकीय पक्षांच्या कुठल्यातरी भाऊ - दादा - आबांच्या अखत्यारीत असतं . अन गणपतीपेक्षाही त्यांचाच 'वरदहस्त ' जास्त मोठा असतो . 

           लोकमान्य टिळकांनी ह्यासाठी  कधीच सार्वजनिक गणेशोत्सव सुरु  केला नव्हता . त्यांचा उद्देश  लोकांनी एकत्र यावे , बाहेर पडून इंग्रज सरकार विरुद्ध लढा देणे हा होता . आज त्याच्या वास्तवाने वेगळेच रूप धारण केले आहे . युद्ध आज देखील संपले नाहीये , भ्रष्टचारा विरुद्ध अन प्रत्यक्ष गणेशाच्याच नावाखाली चाललेलं . कुठेतरी , कधीतरी हे थांबायलाच हवं ना ?

           आज भारतातील 'स्त्री ' जर राष्ट्रपती बनून देश बघते , एक स्त्री बुलेट ट्रेन चालवते , मग गणपती मंडळ का नाही ? एक संधी तर देऊन बघा , बदल आपोआप जाणवेल कारण हि तर 'स्त्रीयांची ' इच्छा आहे   . दुसऱ्याकडे बघण्याआधी सुरुवात स्वतःपासून करा . स्वतः टिळकांनी देखील ' आधी केले मग सांगितले ' .  

Sunday, 23 April 2017

वाढती यांत्रिकता कितपत योग्य ?

               साधारण ४-५ दिवसांपूर्वीची घटना असेल . बर्याच दिवसांनी मित्रांना भेटण्याचा 'योग' जुळून आला होता . एका मॉलमध्ये एकत्र जमलो . गप्पांच्या ओघात वेळ कसा चालला होता तेही कळत नव्हतं . आम्ही वरच्या मजल्यावर बसलो होतो . अचानक ओरडण्याचा आवाज आला . तोच सरशी सगळे उठून  काय झाले ते बघायला गेले . (मॉल मध्ये 'मध्यवर्ती ' भाग हा सहसा पूर्णपणे मोकळा असतो . ) ५ मिनिटे खाली वाकून पाहिल्यावर समजले - एका लहान मुलाचे हाताचे बोट " यांत्रिक जिन्यात " - एस्कलेटर मध्ये अडकले .

              जिवाच्या आकांताने तो कळवळत होता . त्याची आई त्याला कवटाळून होती . त्या क्षणाला कोणीही मदतीला गेले नाही मात्र पटापट 'स्मार्ट फोन' वर चित्रित करणे सुरु झाले . इतकी तर आजकालच्या माणसाची माणुसकी उरलीये . स्मार्टफोन वापरता वापरता माणसाचा स्वतःचा स्मार्टनेस मात्र कधीच हरवलाय .'सोशल ' मीडियावर फोटो अपलोड / शेयर  करून दुःख 'सोसणाऱ्याच्या ' वेदना कधीच  कमी नाही होत ,उलटे त्याचे फक्त 'शोषणच' होते   . महत्त्वाचं फक्त ,त्यांनी  फिरणाऱ्या जिन्याची मोटार मात्र लगेच बंद केली . पण तेवढ्याने त्याच्या वेदना थांबल्या  नाहीतच . २० मिनिटे त्याचा हात तसाच होता ,तेव्हा कुठे ऑपरेटर आला अन त्याने हात मोकळा केला .

               मानवी आयुष्य सुलभ व्हावे यासाठीच खरे तर यंत्रांचा शोध लागला .अन कालानुरूप त्याचा वापर वाढता  झाला . पण वाढती यांत्रिकता कितपत योग्य आहे ? याचा मात्र विचार करायला हवाच . झालेल्या घटनेत मुलाला दोष देणे बिलकुल चुकीचे आहे . मस्ती करणं , उड्या  मारणं हा लहान मुलांचा गुणधर्मच . पण पालकांना मात्र कळायला हवे , मुलांना खेळायला , बागडायला उद्यानात न्यावे न कि  मॉल मध्ये 'प्ले -स्टेशन 'वर .

          धावपळ करण्याच्या नादात माणसाने कृत्रीमपणा  अन यांत्रिकता निवडली . पण त्यांच्यामुळे उद्भवणाऱ्या गोष्टींचा उपाय फक्त अखंड निसर्गात आहे. २०व्या मजल्यावर घर - मग खाली उतरण्यासाठी लिफ्ट - पार्किंगहुन एसी कार मधून मॉल मध्ये यायचं अन इकडे पुन्हा एस्कलेटर. कुठे कुठे जरा चालणे नको . अन मग ह्या साऱ्या गोष्टींमुळेच रक्तदाबाचा त्रास सुरु झाल्यावर , व्यायाम करायला महागडी 'ट्रेडमिल ' घरात आणून ठेवणार . फक्त यासाठीच मेहनत करून पैसे कमवायचेत का ? यातली आर्धी यांत्रिकता जरी टाळली तरी ट्रेडमिल चा खर्च देखील वाचेल अन आयुष्य पण सुरळीत असेल . याचा कुठेतरी प्रत्येकानेच विचार करायला हवा !!