Saturday 6 August 2016

खेळ मांडियेला ... नव्याने


                   आज शनिवार असल्यामुळे ऑफिस ४ वाजता सुटलं. निघत असताना खिडकीतून खाली  किलबिल आवाज येत  होता  . डोकावून पाहिले असता बाजूच्या कॉर्पोरेट ऑफिस  मधले कामगार सुटाबुटात खेळत होते. अचंबित त्या गोष्टीचे नव्हते कि ते खेळत होते , ते जो खेळ खेळत होते त्याचं वाटलं . २ चुनखडीच्या रेषा साधारणपणे १०० मीटर अंतरावर होत्या. एका रेषेच्या आतल्या बाजूस ७/८ कामगार ( जे आज खेळाडू बनले होते .) उभे होते . त्यांच्या हातात वापरात नसलेल्या सायकलचे चाक होते अन दुसर्या हातात एक काठी. 
                   समोरील ते दृश्य पाहून मी क्षणभर स्वतःला विसरलो . पुढच्या क्षणी डोळ्यासमोर होते ते माझ्या प्राथमिक शाळेचे पटांगण . आई खेळायला निघालो गं .... अशी जोरात आरोळी बाहेरूनच द्यायची ,जेणेकरून  स्वंयपाकघरात आवाज पोहोचेल. बाहेर मित्रांचा कंपू उभाच असायचा. थोड्याच वेळात सर्वजण पटांगणात भेटायचे . गावाच्या चोहीकडे भेट द्यावी अशी स्थळे होती. कधी तलावा पलीकडील गणपती  मंदिर , तर कधी हिरवा गालिचा ओढवून नटलेली टेकडी . कधी शासकीय विश्रामगृह परिसरातील उद्यान , तर कधी एखाद्या मित्राच्या शेतातील वनभोजन . शिवबाने जशी मावळ्यांना घेऊन एक-एक स्थळे , गड-किल्ले काबीज केलेत तसेच आम्हालाही वाटे . फरक इतकाच कि त्यांच्याकडे घोडदळ होते , तर आमच्याकडे कधी सायकल किंवा कधी फक्त तिचे चाक अन काठी . 
                   साधारणपणे सुट्टीच्या दिवशी हा दौरा असायचा . इतर दिवशी शाळा सुटल्या- सुटल्या रस्त्याने घरी येत असतानाच आज काय खेळायचे याचा बेत आखला जायचा . क्रिकेटची बॅट  घेण्याइतपत कोणाचा गल्ला नव्हता जमलेला , म्हणून एका फळीने काम भागवले जायचे . ( मुळात म्हणूनच क्रिकेटला मराठीत 'चेंडू - फळी ' बोलतात . अन मराठी फळीला जेव्हा इंग्रजीचा 'शेप ' येतो तेव्हा ती 'बॅट ' होते . ) . कधी दाराच्या मागील सान्यात ठेवलेली विट्टी दांडूचा डाव रंगायचा तर कधी भोवऱ्याची जागतिक स्पर्धा भरायची ( त्याच भोवऱ्याचे मॉडर्न रूप म्हणजे 'बेब्लेड ' ). उन्हाळ्याच्या सुट्टीत तर ठरलेले असायचे , मामाच्या गावी हिरव्या गर्द आंब्याच्या झाडाला बांधलेला झोका अन '४-८-१२' हा खेळ . आजच्या मॉडर्न जगातील ल्युडोचे ते गावरान रुपडे. संख्या बघण्यासाठी ठोकळा किंवा डायस  न वापरता चिंचोके  वापरले जात . 
                   तसेही आजच्या धावपळीच्या  जगात इतका वेळ नाही कोणाकडे खेळ खेळायला . पण जग पुन्हा त्याकडे वळताना दिसतंय . आठवडाभर मॅनेजरच्या तणावात काम करणाऱ्याना तणावमुक्त होण्यासाठी ऑफिसमधेच असले खेळ घ्यायला लागलेत . अन जुन्या खेळांना पुन्हा नव्याने महत्त्व प्राप्त झालय. आजचा पाहिलेला चाक अन काठी , लिंबू- चमचा , रस्सीखेच , पोते -शर्यत अन अजून बरेचसे . याच खेळांना स्मार्टफोनमुळेही वेगळे महत्त्व येतेय. लहान मुलांबरोबरच मोठयांनाहि खेळण्यासाठी हेच मैदानी खेळ मोबाईल अन संगणकावर अवतरलेत. ( क्रिकेट अन फ़ुटबाँल त्याचे उत्तम उदाहरण . ) . उद्या परवा लहान मुले ' ऑनलाईन ' लपंडाव खेळत असतील तर आश्चर्य वाटून  घेऊ नका !!!  

Tuesday 26 April 2016

तिच्या जन्माचा मृत्यू...

स्थळ दवाखान्यातील , एक लहान ५-६ वर्षांची मुलगी बोलते "नाही . . . मला नाही बोलायचं तिच्याशी ,पप्पा  मला म्हणाले भाऊ येईल ,मला भाऊच हवाय ."एव्हढी  लहान मुलगी  इतकं सारं  कसे बिनधास्तपणे बोलून गेली ? जणूकाही तिचे आई -वडील बाजारात खेळणी आणण्यास गेलेत अन तिला न आवडणारी खेळणी त्यांनी उचलून आणली , तर ती परत करायला लावतेय. खरे तर तेथील प्रत्येकाचाच चेहरा जवळपास तसाच होता , फक्त काय तर ती चिमुकली निरागसपणे व्यक्त करत होती आणि मोठयांना मात्र डोळ्यांच्या कोपर्यात आसवे लपवावी लागत होती. 
                     सर्वसाधारण कुटुंबातील हा सध्याच्या दिवसांत हमखास दिसणारा प्रसंग. भारत सरकारने 'गर्भलिंग ' परीक्षणावर बंदी आणल्यामुळे अशा प्रकारचे कुटुंबांचे हिरमोड बरेचदा व्हायला लागलेत . भले कितीही शिकलेली माणसे असो, त्यांचा हट्ट हा मुलासाठीच (का तर म्हणे वंशाला दिवा हवा .अन पुढे तोच दिवा वृद्धाश्रमात हाकलून लावतो तेव्हा चूक उमगते. ). मुलगा कि मुलगी ते आता आधीच बघता येणे शक्य नाही, मग फक्त मुलाचा हव्यास धरायचा अन जर मुलगी झाली तर आईला दोष द्यायला सारे मोकळे. (अन तो कायदा येण्याअगोदर मातृत्वाची काय हालत होती त्याबद्दल न बोललेलंच बरं .)त्याप्रसंगी त्या माउलीची काय चूक किंवा त्या इवल्याश्या जीवाने काय पाप केलं  होतं म्हणून त्याचा इतका तिरस्कार ? जिने नऊ महिने त्रास सहन केला , एक जीव पोटात सांभाळला , तिच्या तब्येतीची कोणीही विचारपूस करणारा नव्हता. ती तर फक्त एक यंत्र आहे ना  त्यांच्यासाठी ,मुले जन्माला घालणारी . मुलगा नाही झाला म्हणजे वरून बोलायचं यंत्रच बिघडलंय.
                  ती लहानगी , अवघ्या काही तासांची ,कुठल्या परिस्थितीतून जात होती याची तिला जाणीवदेखील नव्हती . ती तर आता कुठे श्वास घ्यायला शिकली अन तिचा जन्मोत्सव असा रडून साजरा होतोय ? स्वार्थामुळे आंधळे झालेल्या मानवाला इतके देखील न कळावे कि 'ती ' होती म्हणून त्याचा जन्म झाला , अन 'ती' असेल तरच मानवाच्या पुढच्या पिढी जन्माला येऊ शकतील. जन्माला आलेली 'ती ' ,तिलापण तर जगायचा अधिकार आहे. हे जग तिलादेखील बघायचंय. आपण तिचा हक्क हिरावणारे कोण ?
                   खरेतर तिच्या जन्माचा सोहळा करायला हवा , उत्सव आहे तो. तिला आनंदाने येउद्यात , मग बघा ती कसा आनंद पसरवते. तिलापण खेळू द्या , बागडू द्या , ती तुमच्या अंगणात सुखाचे झाड लावेल. खूप काही लिहायचे आहे , हा विषयच तसा गंभीर होत चाललाय. त्यासाठी सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे कारण फक्त एक व्यक्ती हा बदल नाही घडवू शकत. मागच्या पिढीच्या लोकांना 'ती'चे महत्त्व नाही कळलेले पूर्णपणे म्हणूनच तिच्या जन्माचा मृत्यू झाला. पण आता जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे ,'ती'ला गमावता कामा नये .


येतेय जन्माला कन्यारत्न ,तिला येऊ द्या
मारू नका जीवापासून , तिला जगू द्या .

कळी आहे ती झाडाची , तिला फुलू द्या
मारू नका जीवापासून , तिला जगू द्या.  

आनंद पसरवेल ती , तिला बहरू द्या
मारू नका जीवापासून , तिला जगू द्या. 

इतरांप्रमाणेच बघायचे जग , तिला बघू द्या
मारू नका जीवापासून , तिला जगू द्या. 

फुलपाखरांप्रमाणे स्वच्छंद उडायचंय , तिला  उडू द्या
मारू नका जीवापासून , तिला जगू द्या. 

जन्म तिचा एक सोहळा आहे , तो साजरा करूया
मारू नका जीवापासून , तिला जगू द्या. 

Tuesday 8 March 2016

महिला 'दीन ' मुळीच नव्हे ...

                आधीच्या काळी स्त्रियांना फक्त चूल अन मुल ह्याच दोन गोष्टी सांभाळण्याची मुभा होती. पण आता काळ बदलालाय अन काळाच्या ओघात स्त्रियांचे महत्त्व देखील. हरेक क्षेत्रात त्यांनी प्रगती केलीये. अन आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतेय. जी कामे फक्त पुरुषांची मक्तेदारी आहे असे बोलले जायचे ती कामेही मोठ्या मेहनतीने भारतीय महिला पार पाडत आहेत.

                 उदाहरणाच द्यायचे म्हणजे पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर अवकाशात देखील भारतीय महिलांनी झेंडा रोवलाय. कल्पना चावला अन सुनीता विल्यम्स या दोघींनी मैलाचा दगड (खरे तर मैलाचं  अवकाश ! ) पार केला . कल्पनाने समोर आलेल्या असंख्य अडचणी पार करून अवकाश भरारी घेतली. महाराष्ट्रात कविता राउत  नाव आता सर्वांनाच परिचित आहे. 'सावरपाडा एक्सप्रेस ' नावाने ओळखली जाणारी कविता  लग्नानंतरही विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घालते. चूल अन मुल यापलिकडे सर्वसामान्य भारतीय महिला जिद्दीच्या जोरावर खूप काही साध्य करू शकते याचाच  तिने  दाखला दिला. कविता प्रमाणेच मेरी कोमने सुद्धा अशीच बिकट परिस्थितीवर मात केली.

                   या सार्या घटनांचा पाया घातला  तो  सावित्रीबाई यांनी. स्त्री शिक्षणाची  गंगा  भागीरथी  यत्नाने भारतीय समाजात पोहोचती केली. आज भारतीय महिलांनी शिक्षणाच्या क्षेत्रात मोठमोठी शिखरे सर केली. मी राहत असलेल्या ठिकाणीच बाजूला एक छोटेखानी कारखाना आहे (   जेथे सारे कामं 'लेथ मशीन 'वर केली जातात ). काही दिवसानंतर मला समजले कि तेथे एकही पुरुष कामगार नाही. सुरुवातीला विश्वास नव्हता ,पण आत भेट दिल्यावर पाहिलं तर सर्व महिला !!. नकळतपणे मनात अभिमान दाटून आला. त्या सर्व आज स्वावलंबी जीवन जगतायेत.

                   खरोखरच जिद्दीने आयुष्याशी लढणार्या भारतीय महिलांना मानाचा त्रिवार मुजरा !!!


अंधारात स्वराज्याचा दिवा लावी
तू शिवबाची शक्ती , मा जिजाई
क्रांतीसुर्यास अखंड साथ देई
तू समाजास शिकवणारी सावित्रीबाई

मुलास पाठीशी लावून लढणारी आई
तू रणरागिणी झाशीची , राणी लक्ष्मीबाई
जात्यावर बसून रचल्यास ओवी
तू खानदेशाची बहिणाबाई

सावित्रीच्या लेकी शिकल्या
तिच्या वचनाला सार्या जागल्या
स्वताच्या पायी उभ्या राहिल्या
'चूल -मुल ' सांभाळून कमावू लागल्या

पवित्र अशी भारत 'भू' ची माती
यातूनच घडल्या सार्या नवज्योती
कल्पना , सुनीता अवकाशी जाती
'सावरपाडा  एक्सप्रेस ' -कविता धावती

२१ वे शतक , यांत्रिक युग आले
'फक्त चूल अन मुल 'आता  जमा झाले
सर्वच क्षेत्रे पादांक्रांत केले
भारतीय महिला -पुरुषास खांदा लावून चाले 

Saturday 16 January 2016

… शेवटचा पर्याय ?

'अरे त्या कल्पनाने आत्महत्या केली !'
मित्राने त्याला आलेला संदेश मला पोहोचता केला. तो तर कामाला लागला ,पण माझ्या डोक्यातून काही केल्या ती घटना जात नव्हती . ऐन विशीत असताना लाभलेलं आयुष्य एका क्षणात संपवून टाकले.

           तिच्या जाण्याने जगाच्या लोकसंख्येत काही फरक जाणवणार नाही ,पण ज्यांच्यासाठी ती "जग " होती अशा तिच्या आई-वडिलांना मात्र मोठी दुखापत झालीये. ती तर निघून गेली सोबत काही प्रश्नांची उत्तरे घेऊन, पण त्या दोघांना अनुत्तरीत केलं . मुळात आत्महत्येचा विचार करणे देखील चुकीचे आहे. अन म्हणूनच कि काय कायद्याने तो गुन्हा धरला जातो.

            कोणीतरी बरोबरच म्हटलेले आहे,"हिम्मत लागते जगण्यासाठी अन समोर आलेल्या संकटांना तोंड देण्याची."पण ज्यांना स्वता:च्या क्षमतांबद्दल शंका वाटत असते किंवा काहीतरी चुकीचे वागल्याची भावना मनात सलते तेच असले भ्याडपणाचे पर्याय निवडतात. समाज काय बोलेल या कल्पनेनेच त्यांच्या मनात विचारांचे काहूर माजते. अहो झालेल्या घटनेनंतर लोकं त्याची चर्वणचर्चा करतीलही ,अन कोपऱ्यात असलेल्या कापराप्रमाणे काही दिवसांत ती विरुन सुद्धा जाईल पण खरा फरक पडतो तो जन्मदात्यांना ,जिच्या भविष्यासाठी त्यांची स्वप्ने असतात ,त्यांनाच तिच्याबद्दलचे वाईट स्वप्न पडावे ?

            काल -परवापर्यंत समोर हसणारी , खेळणारी आपली मुलगी आज नाहीये ,नुसता हाच विचार त्यांच्या पोटात गोळा आणतो. तुम्ही केलेल्या चुकांचे प्रायश्चित्त स्वता:च करा. अन करायचेच असेल तर जिद्दीने नवे आयुष्य सुरु करा ,तुमची शिक्षा पालकांनी का भोगावी ? झालेल्या चुका सुधारता येतात पण एकदा गेलेला जीव कसा परत येणार ?

           जसे कुठल्याही कुलुपाला चावी असतेच , तसे समस्या कुठलीही असू देत , मार्ग सापडतात . पण आत्महत्या हा त्यावरचा उपाय नव्हे …कधीच नसावा …


अनमोल आहे जीवन
अर्ध्यावर नको संपवू
दोन पाऊले मागे जा
पण चालणे नको थांबवू

येतील समस्या पुढ्यात हजार
करतील तुझ्यावर प्रहार
राहा तू त्यांस तयार
पण मानू नकोस कधी हार

चुकल्या असतील वाटा
अन निर्णय चुकले तुझे
तरीही नको शोधू पळवाटा
आयुष्य नाही दुजे

प्रायश्चित्त करता येईल
मृत्यूला का निवडावे ?
सुकर सारे नक्कीच होईल
आयुष्य का सोडावे ?

आत्महत्येचा विचार मातीमोल
आयुष्य का संपवायचे ?
जीवन तुझे आहे अनमोल
त्याचे रंग हे जगुनच पहायचे…