अशा खूप कमी घटना आहेत ज्यांनी मला रात्र-रात्रभर जागं ठेवलंय . कालची रात्र देखील त्यातलीच एक होती . डोळ्याला डोळा लागतच नव्हता . निसर्ग वादळ कधीच येऊन गेलं देखील , पण डोक्यात रात्रभर विचारांचे वादळे चालूच . न राहवून लिहायला घेतलं , अन भराभरा ओतून मोकळं केल्यागत ठेवलं. विचार केला , मी जसं लिहून होतो , मनातील भाव मोकळे करतो . चित्रकार कुंचल्यातून व्यक्त होऊन भाव मोकळे करतो . गायक कंठातून गावून व्यक्त होऊन भाव मोकळे करतो . प्रत्येकाच्या छंदा / आवडीनुसार व्यक्त होणे वेगळे , व्यक्त होण्याचे माध्यम देखील वेगळे .पण त्याही पलीकडे विचार येतो , सर्वांना हे खरंच शक्य होते का ? व्यक्त होणे , दुसऱ्याला आपलं मन मोकळं करून दाखवणे ?
माणसाने आज चंद्रावर , मंगळावर याने पाठवलीत , दुसर्या आकाशगंगेत याने गेलीत , त्यांची छायाचित्रे घेणे शक्य झाले . पृथ्वी बाहेरील अथांग जग देखील पालथं घालण्याचा प्रयत्न चालू आहे . हे सर्व बाह्य जगत झालं . पण स्वतःच्या मनात किती खोलवर जाऊ शकला माणूस ? त्याचा थांग लागला कोणाला आजवर ?? बघायला गेलं तर किती छोटीशी गोष्ट आहे मन. अगदीच खोलात मलाही जाणे शक्य नाही . पण इंटरनेट च्या महाजालात जे माहिती स्रोत म्हणून सर्वमान्य आहे - विकिपीडिया , त्यावर जाऊन थोडी माहिती जमा करण्याचा प्रयत्न केला . पहिल्याच वाक्याला त्यांनी एक टीप दिलीये - 'या माहितीची सत्यता पडताळण्यासाठी अतिरिक्त उध्द्वरणांची आवशक्यता आहे'. (This article needs additional citations for verification). म्हणजे त्यावर जे लिखाण झालंय , त्याबद्दल अजूनही पूर्णत्त्व प्राप्त झालेलं नाही .
ते ज्या शक्यते पर्यंत पोहोचले ते खालीलप्रमाणे आहेत .
१. मन आणि मेंदू हे दोन्हीही वेगळे आहेत (Dualism) .
२. मानसिक घटना आणि मेंदूतील घडणाऱ्या गोष्टी ह्या सारख्याच आहेत (Materialism) .
३. फक्त मानसिक घटनाच अस्तित्त्वात आहेत (Idealism).
मेंदू हा एक शरीराचा भाग / अवयव आहे , तर मन केवळ असंख्य विचारांचे भांडे म्हणू शकतो . थोडक्यात मन हे एक असे क्षेत्र आहे , ज्यात स्वतःशिवाय इतर कोणालाही प्रवेश नाही . वरील गोष्टी सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे , कि तुम्ही बाहेरून ओळखू नाही शकत , समोरील व्यक्तीच्या मनात काय चाललंय . पण इतर प्राण्यांपेक्षा माणसाला एक गोष्ट जास्त अवगत आहे . ती म्हणजे विचार करण्याची . प्राण्यांना फक्त मेंदू आहे ते विचार नाही करू शकत . माणसाला आसपासच्या घटना काय आहेत त्यावर विचार करता येतो , वैज्ञानीक तर्क नाहीये ह्या गोष्टीला पण माणसाला हे अवगत आहे . ( खरेतर मन अगदी कुठे आहे हेच ठामपणे अजून कळलेलं नाहीये माणसाला ). हि झाली मनाची शास्त्रीय गोष्ट . आता खऱ्या गोष्टीकडे वळूयात . जर कोणी सांगायला असमर्थ आहे , त्याच्या मनात काय चाललंय , व्यक्त होऊ शकत नाही . किंवा व्यक्त झाल्यावर लोकं मला काय म्हणतील ? , माझ्या बद्दल काय विचार करतील ? , मला अयशस्वी ठरवतील का ? मी चुकलो का ? ह्यासारख्याच असंख्य विचारांचे काहूर माजत असल्यामुळे कदाचित व्यक्त होणे अवघड होऊन बसले आहे . पण हे सर्व बदलण्याची खरंच गरज आहे .
ह्याला दोन्ही बाजू आहेत .
१. एक तर सर्व मनात साचवून ठेवलं तर त्याचा उद्रेक होऊन आत्महत्येसारखं चुकीचं पाऊल उचलले जाऊ शकते . आधी सुद्धा एका लेखात म्हटले आहेच मी. आत्महत्या हा उपाय कधीच नव्हता , नाहीये आणि नसेलही . तुमच्या जाण्याने जगाला काडीमात्र फरक पडणार नसतो , पण तुम्ही ज्यांच्यासाठी जग आहात त्यांना मात्र फार फरक पडतो तुमच्या जाण्याने .
२. पण खरंच त्याच्याही पलीकडे विचार केला असता असे जाणवते , का कोणी इतका टोकाच्या भूमिकेला जावं ? त्याला जे मानसिक समाधान /मन : शांती हवीये ती खरच मिळतेय का ? अर्थात ह्या सर्वांचा भौतिक सुखासोबत संबंध जोडणे देखील योग्य नाही . ज्यांचं जगात नाव झालाय , प्रसिद्धी आहे , पैसा आहे ती व्यक्तीदेखील असे पाऊल उचलताय . हि खरोखरीच धोक्याची घंटा आहे मानवासाठी .
समोरच्या माणसाचं असणं महत्त्वाचं आहे ना कि त्याच्या समस्या , ज्यामुळे तो मानसिक त्रासात आहे . आज माणसामध्ये असलेला विसंवाद ह्याला काही अंशी कारणीभूत आहे . त्यावर काम करणे गरजेचे आहे . स्वतःचा अहंकार समोरच्या व्यक्तीपेक्षा मोठा कधीच नसावा . आभासी जगात , सोशल मीडियावर तुमचे लाखो - करोडो मित्र /फॉलोवर्स असतील , पण तुमच्यासोबत तुमचं ऐकणारा आपला व्यक्ती नसेल तर तुमचं आणि तुमच्या जवळच्या व्यक्ती दोघांचंही चुकतंय . दोघांनी स्वतःच्या भूमिका नीटपणे निभावल्या पाहिजेत . स्वतः कधी टोकाचा विचार करायचा नाही , आणि दुसरा करतोय किंवा एकटा पडतोय , तर त्याला अजून दूर ढकलणे योग्य नाही . कारण व्यक्ती निघून गेल्यावरच जास्त आठवणी काढल्या जातात . मग जिवंत असतानाच का काळजी घेतली जात नाही ? समोरच्या व्यक्तीसोबतचा संवाद तुमच्यासाठी नसेलही तितकासा महत्त्वाचा , पण समोरील व्यक्तीसाठी नक्कीच आहे . ज्या क्षणाला समोरच्याचे बोलणे हे तुम्हाला रडगाणे वाटू लागते , तो हाच क्षण असतो का , जेव्हा तुम्ही समोरचा माणूस आणि त्याच्यासोबतचं नातं दोन्ही गमावता ? व्यक्ती आणि नातं गमावल्यानंतर रडगाणे करण्यापेक्षा त्याचे रडगाणे ऐकून घेणं कधीही योग्यच नाही का ?
काल झालेल्या घटनेमुळे पुढील काही दिवस खूप सारे मानसोपचार तज्ञ् जन्म घेतील . आपल्याला त्यात देखील जाऊन काही जटिल (Complex) करायचं नाही . साधं , सरळ अन सोप्प , आपल्या माणसांची काळजी घ्या त्यांच्याशी व्यक्त व्हा , त्यांना सुद्धा बोलते करा. कदाचित उद्या तुम्ही देखील आजूबाजूला माणसांची गर्दी असून एकटे व्हाल .
विसंवादाचा विपर्यास करू नका ! सुसंवाद ठेवा !!
अगदी बरोबर लिहिलं आहे दादा 👍..आताच्या पिढीला असेच काही वाचण्याची गरज आहे😢👌👌👌👍👍👍
ReplyDeleteअगदी खर आहे माणसाने संवाद साधून व्यक्त झालं पाहिजे
ReplyDeleteअगदी बरोबर व्यक्त झालंच पाहिजे 👍👍
ReplyDelete