दृष्टिहीनता मोठ्या पदाची
त्यादिवशी दुपारी सहज फेसबुकची पाने चाळत होतो. अन कोणीतरी मला ऑनलाईन 'पहिलं ' . त्याचा मला लगेच फोन आला . नवीन नंबर अन आवाज अनोळखी ,"हेलो,मी प्रमोद ,ओळखलं का मला ? मग त्यानेच ओळख सांगितली. हा तोच प्रमोद होता ज्याने मला काही दिवसांपूर्वीच 'बघायला ' शिकवलं होत. (माझा पहिला ब्लॉग त्यावरच लिहिलाय . ) फोन करण्याच कारण विचारलं असता समजले कि त्याचा कोणी चंद्रप्रकाश नावाचा मित्र आहे. अन आज त्याची परिक्षा. तोही प्रमोद सारखाच. देवाने त्याला प्रकाश दिसण्यासाठी जरी डोळे दिले नसले तरी स्वत:च त्याचा शोध घेणारा.
थोड्यावेळात मला समजले, चंद्रप्रकाश मध्यप्रदेशहून आलेला होता. त्याची बँकेची शेवटची परिक्षा होती. आधीच्या परिक्षेचा अडथळा तो पार करून आलेला होता. पण त्याच्या नशिबात भलतेच काही लिहिलेले असावे. म्हणूनच कि काय त्याला आधी हो बोलणारा मदतनीस अचानक तब्येत बिघडली म्हणून येवू शकत नव्हता. ऐनवेळेस असं नाही सांगितल्यामुळे त्यांची धावपळ झाली. अन मग तेव्हा मला प्रमोदचा फोन आला. परिक्षा १:३० वाजता होती. अन १:०० वाजता आत प्रवेश करायचा होता. मी फोनवर बोलणं झाल्यावर स्वत: तिथे मदतनीस म्हणून जायचा निर्णय घेतला. तोपर्यंत १२:५० वाजले देखील होते. तेव्हा एक जाणवले ,अशा निकडीच्या वेळी क्वचितच कोणी पुढे येतं. कदाचित कोणाला इच्छा असून पण नाही जमत.
प्रमोदशी बोलणं झाल्यावर मी लगेच सागरला फोन करून मला परिक्षाकेंद्रावर सोडण्याबाबत विचारले . क्षणाचाही विलंब न करता सागरने होकार दर्शवला. अन आम्ही परिक्षा केंद्रावर जायला निघालो. हायवे वरील गर्दी करणारी रहदारी अक्षरश: चिरत आम्ही वेगाने गेलो. मला परिक्षा केंद्राच्या गेटवर सोडून सागर निघून गेला.तिथे जायला मला ५ मिन. उशीर झाला होता. पण तेव्हा समोर वेगळेच चित्र उभे होते . चंद्रप्रकाश प्रमाणेच अजून एक परिक्षार्थि , दोघेही बाहेर उभे होते. अन त्याच्यासोबत आलेली स्त्री त्या माणसाला विनवत होती. मला परिस्थितीचा अंदाज यायला उशीर नाही लागला. बाजूला अजून एक मुलगा उभा होता, जो चंद्रप्रकाश अन त्याच्या बहिणीचं संभाषण ऐकून त्याचा मदतनीस होण्यास तयार झाला होता. अगदी २ मिन. फरक झाला असेल अन त्यांनी गेट बंद केलं होतं. दुसर्या परिक्षार्थिच पण तसच काहीसं झालं. फक्त पार्किंगला असलेल्या गाडीतून पासपोर्ट फोटो आणण्याचा विलंब.
एव्हाना १:१५ झाले होते. दारावर उभ्या असलेल्या (निर्बुद्ध ) माणसाने आमचे १५ मिन. व्यर्थ घातले. तो आम्हाला आत जाउच देइना. मग शेवटचा उपाय म्हणून परिक्षा केंद्राप्रमुखांना बोलावण्यात आले. काही वेळ तसाच गेल्यानंतर अगदी कोणी सेलेब्रेटी असल्याप्रमाणे ३ सुटाबुटातील व्यक्ती समोर आल्या. आमचं बोलणं केवळ अर्धवटच ऐकून आम्ही नियमानुसार निर्धारित वेळेत नाही आलो म्हणून परिक्षेला बसूच नाही देणार असं त्यांनी ठरवलं. आम्ही हरेक प्रकारे त्यांना विचारले पण आमचे प्रयत्न असफल झालेत . इतकं सारं घडत असतानाही त्या दोघांनी एक शब्दही उच्चारला नाही. यात त्यांचा असलेला प्रामाणीकपणा दिसून येतो.
सरतेशेवटी त्या दोघांना परिक्षा देता नाही आली. अन आम्ही तेथून निराश चेहरा करून मागे झालो . आज क्षमता नसलेल्या कितीतरी लोकांना तितक्या मोठ्या पदावर बसवले जाते . केवळ पैसा अन वशिल्याच्या जोरावर. पण ज्यांना खरच गरज आहे अशांना बेमालूमपणे डावलण्यात येते. त्यादिवशी जर चंद्रप्रकाश अन त्या व्यक्तीला आत परिक्षेला जाऊ दिले असते तर कदाचित त्यांच आयुष्य आज वेगळ राहिलं असतं. ते त्यांच्या स्वत:च्या पायावर उभे राहिले असते. त्या व्यक्तींना सहानुभूतीची गरज कधीही नसते अन ते त्याची कधी अपेक्षाहि करत नाहीत. त्यांना फक्त एक छोटीशी संधी हवी असते ज्यातून ते स्वता:च्या आतिल गुणांना देऊ इच्छिता.
खरे तर त्यांची इच्छाशक्ती इतकी प्रबळ असते कि ते गेलेल्या संधीपेक्षा जास्त काहीतरी मोठं करून दाखवतीलही. पण आज देखील समाजात त्या परिक्षाकेंद्रप्रमुखांप्रमाणे डोळे असूनही 'दृष्टिहीन ' लोकं आहेत त्यामुळेच कुठेतरी मनाला बोचते.
Sad truth of our Society bro!!!!
ReplyDeletemast tushar barobar ahe tuje
ReplyDelete