Monday, 7 October 2019

आजचे आधुनिक सीमोल्लंघन

             उद्या दसरा आहे . परंपरेनुसार अनादी काळापासून  हा  सण / उत्सव साजरा केला जातोय . त्यातल्या दोन महत्त्वाच्या कथा , एक म्हणजे देवीचा राक्षस प्रवृत्तीवर झालेल्या विजयाचे प्रतीक तर दुसरी म्हणजे राम- रावणाचे युद्ध  ह्याच दिवशी संपन्न झाले आणि प्रभू श्रीरामांनी विजयश्री आणली. म्हणून ह्याच दिवशी भारतात सर्वत्र रावणाच्या पुतळ्याचे देखील दहन केले जाते . हि वरील आख्ययिका जवळपास  सर्वानाच ज्ञात आहेत. त्याव्यतिरिक्त अजून काही कथा आहेत त्यानुसार दसऱ्याच्या दिवसाचे महत्त्व आहे .

             पांडवांनी अज्ञातवास संपवून शक्तिपूजन शमी वृक्षाच्या ढोलीत ठेवलेली  शस्त्रे  परत घेतली आणि कौरव सैन्यावर विजय मिळवला  तो ह्याच दिवशी.
महाराष्ट्रातील वीर मावळे मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या-नाण्याच्या रूपाने संपत्ती घरी आणत .  असे हे  विजयी शिलेदार मोहिमेवरून परत आले कि दारात त्यांना घरातील स्त्रिया ओवाळीत असत . आणि त्याचेच प्रतीक म्हणून  आज  आपण  आपट्याची पाने सोने म्हणून दसऱ्याला एकमेकांना वाटून तो सोहळा साजरा करतो .
दसरा ह्या सणाला कृषीविषयक देखील महत्त्व आहे . पावसाळ्यात पेरलेले  पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत असत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या मातीवर नऊ धान्याची पेरणी करतात आणि दसऱ्याच्या दिवशी त्या धान्याचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात .  नवरात्रीत होणाऱ्या चक्रपुजा हा देखील त्याच परंपरेचा एक भाग आहे .

             अगदी माझ्या लहानपणीची गोष्ट , साधारण २००० वगेरे साली . दसऱ्याच्या दिवशी सकाळी उठून घराची साफसफाई करायची , गाडी - सायकल स्वच्छ धुवून चकाचक करायची . ( याच दिवशी पूर्वी सरदार लोक आपली शस्त्रे उपकरणे साफ करून त्यांची पूजा करीत असत . शेतकरी , कारागीर हे आपली नांगर , आऊते , हत्यारे ह्यांची पूजा करतात . ) वडिलांसोबत गावठाण जंगलात जायचं , तेव्हा प्रत्येक गावाचे असे जंगल राखलेले असायचे . काही खेड्यात अजूनही आहेत . जंगलातून आपट्याच्या झाडाची फांदी घ्यायची आणि पुन्हा घरी यायचं . दारात आई पूजेचं ताट घेऊन तयार असायची . आई ताट ओवाळायची तशी मान देखील गोल फिरवण्यात वेगळीच मज्जा होती . थोडं मोठं झाल्यावर समजलेलं त्याला "सीमोल्लंघन" म्हणत असत . आपट्याच्या फांदीची पाने लहानग्या खिश्यात कोंबायची आणि गावभर 'सोन ' वाटत हिंडायचं . सगळीकडे नव-चैतन्याचे वातावरण असायचं .

            नंतर जसजसे मोठं होत गेलो तसतसे 'पर्यावरण ' हा शब्द उमगत गेला , अभ्यासातून , वर्तमानपत्रातून ( बरं  झालं त्यावेळी  फेसबुक  किंवा व्हाट्सअँप  नव्हतं . ) खेड्यातून तालुक्याला घर बदलले . आधी सहज सीमोल्लंघन करून लुटून आणलेलं सोनं ( आपटयाची पाने ) आता बाजारातून विकत आणावं लागत असे . जणू काही आपण सोन नव्हे तर सोन विकणाराच आपल्याला  लुटतो . त्यामागची अर्थकारण आणि पर्यावरणीय कारणे देखील तशी वेगळी होती . हा सर्व बदल डोळ्यांदेखत घडत गेला . आजही त्याच बदलातून जातोय आपण . आधी गावभर  फिरून घरोघरी जाऊन सोने वाटत होतो , आता नेटभर सर्फ करून प्रत्येकाच्या वॉल /ग्रुप वर सोने उपलोड करतोय आपण . लहानपणी झाडाची एक फांदी तोडली जात होती तर दुसरी दोन झाडे लावून जगवली देखील जात होती .  आज तसं होतय  का ?  फक्त लाईक्स  आणि हॅशटॅग ट्रेंडिंग व्हावा किंवा ह्या गोष्टी सोशियल मीडिया वर पसरवल्या म्हणजे आपण 'कूल ' आहोत काळासोबत चाललोय असा गोड  गैरसमज  पसरलाय .

             अगदी जवळचेच उदाहरण आहे , मुंबईतील मेट्रो च्या  कार शेड साठी आरे  कॉलनी तील जंगलचा काही हिस्सा ग्रहण करण्यात आलाय . काल - परवा अंधारात झाडे तोडायला सुरुवात देखील झाली . खूप लोकांनी आंदोलने केली , ट्विटर , फेसबुक , व्हाट्सअँप सर्वीकडे शेयर देखील करण्यात आलं . आरे वाचवा हॅशटॅग पण ट्रेंडिंग झाला . पण 'आरे वाचवा' म्हणनाऱ्यांची 'आरोळी ' फक्त आरे पुरतीच मर्यादित हवीये का ? सर्वच बाबतीत बदल नको का घडायला ?लहान पणी जस आपण आपटयाची पाने वाटत फिरत होतो तसं  आता फिरलो तर ?
बदल फक्त इतकाच करायचंय , ह्यावेळी जिवंत झाडाची पाने न तोडता जिवंत झाडाच्या बिया वाटायच्या  !!!

           फेसबुक वर २००० मित्र आहेत , प्रत्येकाच्या वॉल वर फोटो उपलोड करण्यापेक्षा प्रत्येकाला २-२ बिया वाटल्यास नाही का घडणार बदल ? ( आरे जंगलाची किती झाडे तोडलीत , का तोडलीत , कोणाची परवानगी वगेरे  हा सर्व न्याय्य प्रविष्ठ विषय आहे , त्यात हात नको घालायला . आपण प्रत्यक्षात काय केलाय आणि काय करायला हवं हे बोललेलं कधीही योग्यच . ) सोशिअल  मीडिया वर  फक्त हॅशटॅग ट्रेंडिंग करण्यापेक्षा  प्रत्यक्ष  जीवनात आपण ह्या नवीन गोष्टी देखील ट्रेंडिंग करू शकतोय ना ? ह्या आजच्या आधुनिक सीमोल्लंघनाचा बदल घडावा हा प्रयत्न फक्त एकाने नव्हे तर सर्वांकडूनच अपेक्षित आहे . 

1 comment:

  1. Nostalgic... And inspiring... You should give your blogs in newspapers dude... Everyone deserves to read your good writing... Keep it up buddy..

    ReplyDelete