दर वर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा अगदी काठावर सुट्टी मिळाली , गणेश चतुर्थी साठी . १७-१८ तासांच्या प्रवासा नंतर घरी पोहोचलो . आल्यावर लगेचच घरातल्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली . मंडळाच्या गणपतीची तयारी बघायला निघालो तर समजलं कि ह्यावेळीचा गणेशोत्सव थोडा वेगळा आहे . अध्यक्षांपासून खजिनदारापर्यंत सर्व जबाबदारी महिला मंडळाने लीलया पेललीये . अगदी वर्गणी गोळा करण्यापासून सर्वच महिलांनी हिरीरीने भाग घेतला . देणगी देणार्याला पण विश्वास होताच कि दिलेली देणगी सत्कारणी लागणार म्हणून . एरवी घरातलं बजेट काटेकोरपणे सांभाळणाऱ्या ह्या स्त्रिया हेदेखील बजेट सांभाळू शकतात यात तिळमात्र शंका नाही .
मी अगदी लहान असल्यापासून बघत आलोय , मूर्तीची प्रतिष्ठापना असो किंवा इतर कामे आदी सर्व गोष्टी पुरुष मंडळी , तरुण मुले बघत असत . किंबहुना तथाकथित पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे सर्वत्र हेच बघावयास मिळते . साहजिकच सर्व बाबतीत त्यात पुरुषांचा उजवेपणा दिसू लागतो किंवा अहम दिसतो .
कर्कश आवाजात गाणी वाजवणे हा त्यातलाच एक प्रकार . काळाच्या ओघात सुमधुर गणपतीची गाणी , आरत्या बाजूला सारून तिथे "मुन्नी बदनाम" होत असते. वाटतच नाही गणपती बसलेत कि 'कार्य(न )कर्ते ' पार्टी करायला बसलेत .
स्वखुशीने , यथाशक्ती वर्गणी जमा करण्याचे दिवस आता मागे पडलेत . २० - २५ कार्य(न)कर्त्यांची 'गॅंग ' घरात घुसून अपेक्षित असलेली रक्कम भेटल्याशिवाय न सोडणारी . मूर्ती , इतर शोभीकरण , देखावे करून उरलेले वर्गणीचे पैसे स्टेज खालीच बसून पत्ते खेळणे अन तत्सम कारणांसाठी उडवले जातात . ह्या गोष्टींची इतरांना देखील कुणकुण असते पण त्यावर भाष्य करण्यास तयार नसतं . कारण मंडळ राजकीय पक्षांच्या कुठल्यातरी भाऊ - दादा - आबांच्या अखत्यारीत असतं . अन गणपतीपेक्षाही त्यांचाच 'वरदहस्त ' जास्त मोठा असतो .
लोकमान्य टिळकांनी ह्यासाठी कधीच सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला नव्हता . त्यांचा उद्देश लोकांनी एकत्र यावे , बाहेर पडून इंग्रज सरकार विरुद्ध लढा देणे हा होता . आज त्याच्या वास्तवाने वेगळेच रूप धारण केले आहे . युद्ध आज देखील संपले नाहीये , भ्रष्टचारा विरुद्ध अन प्रत्यक्ष गणेशाच्याच नावाखाली चाललेलं . कुठेतरी , कधीतरी हे थांबायलाच हवं ना ?
आज भारतातील 'स्त्री ' जर राष्ट्रपती बनून देश बघते , एक स्त्री बुलेट ट्रेन चालवते , मग गणपती मंडळ का नाही ? एक संधी तर देऊन बघा , बदल आपोआप जाणवेल कारण हि तर 'स्त्रीयांची ' इच्छा आहे . दुसऱ्याकडे बघण्याआधी सुरुवात स्वतःपासून करा . स्वतः टिळकांनी देखील ' आधी केले मग सांगितले ' .
No comments:
Post a Comment