Sunday 23 April 2017

वाढती यांत्रिकता कितपत योग्य ?

               साधारण ४-५ दिवसांपूर्वीची घटना असेल . बर्याच दिवसांनी मित्रांना भेटण्याचा 'योग' जुळून आला होता . एका मॉलमध्ये एकत्र जमलो . गप्पांच्या ओघात वेळ कसा चालला होता तेही कळत नव्हतं . आम्ही वरच्या मजल्यावर बसलो होतो . अचानक ओरडण्याचा आवाज आला . तोच सरशी सगळे उठून  काय झाले ते बघायला गेले . (मॉल मध्ये 'मध्यवर्ती ' भाग हा सहसा पूर्णपणे मोकळा असतो . ) ५ मिनिटे खाली वाकून पाहिल्यावर समजले - एका लहान मुलाचे हाताचे बोट " यांत्रिक जिन्यात " - एस्कलेटर मध्ये अडकले .

              जिवाच्या आकांताने तो कळवळत होता . त्याची आई त्याला कवटाळून होती . त्या क्षणाला कोणीही मदतीला गेले नाही मात्र पटापट 'स्मार्ट फोन' वर चित्रित करणे सुरु झाले . इतकी तर आजकालच्या माणसाची माणुसकी उरलीये . स्मार्टफोन वापरता वापरता माणसाचा स्वतःचा स्मार्टनेस मात्र कधीच हरवलाय .'सोशल ' मीडियावर फोटो अपलोड / शेयर  करून दुःख 'सोसणाऱ्याच्या ' वेदना कधीच  कमी नाही होत ,उलटे त्याचे फक्त 'शोषणच' होते   . महत्त्वाचं फक्त ,त्यांनी  फिरणाऱ्या जिन्याची मोटार मात्र लगेच बंद केली . पण तेवढ्याने त्याच्या वेदना थांबल्या  नाहीतच . २० मिनिटे त्याचा हात तसाच होता ,तेव्हा कुठे ऑपरेटर आला अन त्याने हात मोकळा केला .

               मानवी आयुष्य सुलभ व्हावे यासाठीच खरे तर यंत्रांचा शोध लागला .अन कालानुरूप त्याचा वापर वाढता  झाला . पण वाढती यांत्रिकता कितपत योग्य आहे ? याचा मात्र विचार करायला हवाच . झालेल्या घटनेत मुलाला दोष देणे बिलकुल चुकीचे आहे . मस्ती करणं , उड्या  मारणं हा लहान मुलांचा गुणधर्मच . पण पालकांना मात्र कळायला हवे , मुलांना खेळायला , बागडायला उद्यानात न्यावे न कि  मॉल मध्ये 'प्ले -स्टेशन 'वर .

          धावपळ करण्याच्या नादात माणसाने कृत्रीमपणा  अन यांत्रिकता निवडली . पण त्यांच्यामुळे उद्भवणाऱ्या गोष्टींचा उपाय फक्त अखंड निसर्गात आहे. २०व्या मजल्यावर घर - मग खाली उतरण्यासाठी लिफ्ट - पार्किंगहुन एसी कार मधून मॉल मध्ये यायचं अन इकडे पुन्हा एस्कलेटर. कुठे कुठे जरा चालणे नको . अन मग ह्या साऱ्या गोष्टींमुळेच रक्तदाबाचा त्रास सुरु झाल्यावर , व्यायाम करायला महागडी 'ट्रेडमिल ' घरात आणून ठेवणार . फक्त यासाठीच मेहनत करून पैसे कमवायचेत का ? यातली आर्धी यांत्रिकता जरी टाळली तरी ट्रेडमिल चा खर्च देखील वाचेल अन आयुष्य पण सुरळीत असेल . याचा कुठेतरी प्रत्येकानेच विचार करायला हवा !!

No comments:

Post a Comment