Wednesday, 18 January 2017

दिवार - ए - इन्सानियत

 माणुसकीची भिंत

दरवर्षीप्रमाणे ह्या वेळेसही थंडीचा तडाखा कायम आहे. हिवाळा सरत आला , नुकताच सूर्याने मकर राशीत देखील प्रवेश केलाय . पण हा हिवाळा मात्र थोडा वेगळा आहे . कामानिमित्त माझे नाशिक ,पुणे  इथे चक्कर झालेत अन घरी मालेगावी सुद्धा . ह्या सर्व ठिकाणी मला एक गोष्ट आढळली ,जी तुम्हीसुद्धा नक्कीच पाहिली असणार - "माणुसकीची भिंत "

जे नको असेल ते ठेवून जा अन जे हवे असेल ते घेऊन जा . असा संदेश देणारी . फूटपाथवर झोपणाऱ्याना किंवा गरीब लोकांना कि ज्यांना एकावेळेच्या जेवणाची भ्रांत असते त्यांना उब देणारी . गरीब-श्रीमंतांच्या 'दरीबद्दल ' सर्वच बोलतात किंबहुना सर्वांना परिस्थिती चांगलीच ठाऊक आहे . (त्याबद्दल आत्ता  भाष्य नको. )फक्त "फॅशनच्या " नावाखाली किंवा "ट्रेंड " म्हणून दरवर्षी नव-नवीन कपडेलत्ते , स्वेटर्स  घेणारे दरीच्या उंच टोकावर आहेत . अन कुटुंबातल्या एकही सदस्याचं 'धड' धडपणे झाकण्याची ऐपत नसणारे दरीच्या पायथ्याशी . हीच मानसिकता बदलण्यासाठी नोव्हेंबर २०१६ मध्ये नागपूर येथील एका शाळेने प्रयत्न केला . अन भारतात "माणुसकीच्या भिंतीचा " पाया घातला.

नको असलेले अन जास्तीचे कपडे घरात साठवून ठेवण्यापेक्षा किंवा इतरत्र फेकण्यापेक्षा  तिथे ठेवून द्यायचे जेणेकरून ज्यांना त्याची गरज  त्यांना ते वापरात येतील. जगातील काही लोकांनी माणुसकी जरी सोडली असली म्हणून सर्वांनीच  सोडलीये असं नाही . अन म्हणूनच पाहता पाहता त्या भिंतीचा प्रसार झाला ,त्या योजनेला प्रतिसाद मिळाला . ज्ञानेश्वरांनी भिंत चालवल्याचे फक्त ऐकण्यात आहे पण आजच्या काळात हि भिंत चालवणे खूप महत्त्वाचे आहे . ह्या भिंतीची चालदेखील तितकीच क्रांतिकारी असणार आहे . आज संपूर्ण भारतात पसरलेल्या ह्या भिंतीचे मूळ पाकिस्तानात आहे . ( ज्याप्रमाणे भारतातील प्रत्येक मुसलमान हा भारतविरोधी नाहीये  त्याप्रमाणेच पाकिस्तानात देखील चांगले लोकं आहेत !)

रोहयाल वरिंद नावाच्या एका मुलाने वयाच्या १५व्या वर्षी हि कल्पना आमलात आणली . कपडे ,औषध-गोळ्या , जेवणाची सोय ह्या सर्व गोष्टी त्याच्या डोक्यात होत्या. पाकिस्तानातील फैसलाबाद येथे फेब्रुवारी २०१६ मध्ये त्याची सुरुवात झाली . अन आज त्याच्या ह्या छोट्याश्या कल्पनेला जागतिक स्वरूप प्राप्त झालय .तात्पर्य एकच , कुठल्याही गोष्टीची सुरुवात हि स्वतःपासून करावी लागते ,त्यानंतर तिचं  स्वरूप नक्कीच विस्तृत होणार .
भारतात सुरु झालेली हि भिंत फक्त हिवाळ्यासाठीच मर्यादित न राहता ती इतर सोयींसाठी देखील आमलात
आणायला हवी .

(हा लेख वाचणाऱ्यांना माझं एकच आवाहन आहे , जर तुमच्या परिसरात हि भिंत नसेल तर स्वतः पुढाकार घेऊन तुम्हीदेखील ती उभी करू शकता . )