Tuesday, 3 November 2015

दृष्टिहीनता मोठ्या पदाची

    दृष्टिहीनता मोठ्या पदाची         
              त्यादिवशी दुपारी सहज फेसबुकची पाने चाळत होतो. अन कोणीतरी मला ऑनलाईन 'पहिलं ' . त्याचा मला लगेच फोन आला . नवीन नंबर अन आवाज अनोळखी ,"हेलो,मी  प्रमोद  ,ओळखलं  का मला ? मग त्यानेच ओळख सांगितली. हा तोच प्रमोद होता ज्याने मला काही दिवसांपूर्वीच 'बघायला ' शिकवलं होत. (माझा पहिला  ब्लॉग   त्यावरच लिहिलाय . ) फोन  करण्याच कारण विचारलं असता समजले कि त्याचा कोणी चंद्रप्रकाश नावाचा मित्र आहे. अन  आज त्याची परिक्षा. तोही प्रमोद सारखाच.  देवाने त्याला प्रकाश दिसण्यासाठी जरी डोळे दिले नसले  तरी स्वत:च त्याचा शोध घेणारा. 
           थोड्यावेळात मला समजले, चंद्रप्रकाश  मध्यप्रदेशहून आलेला होता. त्याची बँकेची शेवटची  परिक्षा होती. आधीच्या परिक्षेचा अडथळा तो  पार करून आलेला होता. पण त्याच्या  नशिबात भलतेच काही लिहिलेले असावे. म्हणूनच कि काय त्याला आधी हो बोलणारा मदतनीस अचानक तब्येत बिघडली म्हणून येवू शकत नव्हता. ऐनवेळेस असं नाही सांगितल्यामुळे त्यांची धावपळ झाली. अन मग तेव्हा मला प्रमोदचा फोन आला. परिक्षा १:३०  वाजता होती. अन १:०० वाजता आत प्रवेश करायचा होता. मी फोनवर बोलणं झाल्यावर स्वत: तिथे मदतनीस म्हणून जायचा निर्णय घेतला. तोपर्यंत १२:५० वाजले देखील होते. तेव्हा एक जाणवले ,अशा निकडीच्या वेळी क्वचितच कोणी पुढे येतं. कदाचित कोणाला इच्छा असून पण नाही जमत. 
            प्रमोदशी बोलणं झाल्यावर मी लगेच सागरला फोन करून मला परिक्षाकेंद्रावर  सोडण्याबाबत विचारले .  क्षणाचाही विलंब न करता सागरने होकार दर्शवला. अन आम्ही परिक्षा केंद्रावर जायला निघालो. हायवे वरील गर्दी करणारी रहदारी अक्षरश: चिरत आम्ही वेगाने गेलो. मला परिक्षा केंद्राच्या गेटवर सोडून सागर निघून गेला.तिथे जायला मला ५  मिन. उशीर झाला होता. पण तेव्हा समोर वेगळेच चित्र  उभे होते .  चंद्रप्रकाश प्रमाणेच अजून एक परिक्षार्थि , दोघेही बाहेर उभे होते. अन त्याच्यासोबत आलेली स्त्री त्या माणसाला विनवत होती. मला परिस्थितीचा अंदाज यायला उशीर नाही लागला. बाजूला अजून एक मुलगा उभा होता, जो चंद्रप्रकाश अन त्याच्या बहिणीचं संभाषण ऐकून त्याचा मदतनीस होण्यास तयार झाला होता. अगदी २ मिन. फरक झाला असेल अन त्यांनी गेट बंद केलं होतं. दुसर्या परिक्षार्थिच पण तसच काहीसं झालं. फक्त पार्किंगला असलेल्या गाडीतून पासपोर्ट फोटो आणण्याचा विलंब. 
             एव्हाना १:१५ झाले होते. दारावर उभ्या असलेल्या (निर्बुद्ध ) माणसाने आमचे १५ मिन. व्यर्थ घातले. तो आम्हाला आत जाउच देइना. मग शेवटचा उपाय म्हणून परिक्षा केंद्राप्रमुखांना बोलावण्यात आले. काही वेळ तसाच गेल्यानंतर अगदी कोणी सेलेब्रेटी असल्याप्रमाणे ३ सुटाबुटातील व्यक्ती समोर आल्या. आमचं  बोलणं केवळ अर्धवटच ऐकून आम्ही नियमानुसार निर्धारित वेळेत नाही आलो म्हणून परिक्षेला बसूच नाही देणार असं त्यांनी ठरवलं. आम्ही हरेक प्रकारे त्यांना विचारले पण आमचे प्रयत्न असफल  झालेत . इतकं  सारं घडत असतानाही त्या दोघांनी एक शब्दही उच्चारला नाही. यात त्यांचा असलेला प्रामाणीकपणा दिसून येतो. 
            सरतेशेवटी त्या दोघांना परिक्षा देता नाही आली. अन आम्ही तेथून निराश चेहरा करून मागे झालो . आज क्षमता नसलेल्या कितीतरी लोकांना  तितक्या मोठ्या पदावर बसवले जाते . केवळ पैसा अन वशिल्याच्या जोरावर. पण ज्यांना खरच गरज आहे अशांना बेमालूमपणे डावलण्यात येते. त्यादिवशी जर चंद्रप्रकाश अन त्या  व्यक्तीला आत परिक्षेला जाऊ दिले असते तर कदाचित त्यांच आयुष्य आज वेगळ राहिलं  असतं. ते त्यांच्या स्वत:च्या पायावर उभे राहिले असते. त्या  व्यक्तींना सहानुभूतीची गरज कधीही नसते अन ते त्याची कधी अपेक्षाहि करत नाहीत. त्यांना फक्त एक छोटीशी संधी हवी असते ज्यातून ते स्वता:च्या आतिल गुणांना  देऊ इच्छिता. 
                खरे तर त्यांची इच्छाशक्ती इतकी प्रबळ असते कि ते गेलेल्या संधीपेक्षा जास्त काहीतरी मोठं करून दाखवतीलही. पण आज देखील समाजात त्या परिक्षाकेंद्रप्रमुखांप्रमाणे डोळे असूनही 'दृष्टिहीन ' लोकं  आहेत त्यामुळेच कुठेतरी मनाला बोचते.             

Saturday, 5 September 2015

My first teacher

                ती काही महाविद्यालयात प्राध्यापिका नाहीये , ना कुठल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. पण ती माझ्यासाठी , मला आयुष्य शिकवणारी माझी शिक्षिकाच आहे.माझी आईच माझी पहिली गुरु आहे.  तिच्या वागण्यातील प्रत्येक कृतीतून काहीतरी शिकायला मिळते. जीवनप्रवासात आलेल्या अडचणींना सामोरं जाताना मी तिचेच अनुकरण करतो असे म्हटल्यास वावग ठरणार नाही. समोर आलेली परिस्थिती कितीही बिकट असो ,ती सहजतेने कशी हाताळावी याची तिला चांगलीच हातोटी आहे. 

                सामाण्यवर्गातील आमचं चौकोनी कुटुंब ,आई-वडील ,एक लहान भाऊ अन मी. त्या कुटुंबाचा आधारस्तंभच ती असल्यामुळे ते भक्कम आहे. आजोबा वारकरी सांप्रदायातील असल्यामुळे तिला व तिच्यापासून आम्हाला संस्कारांचे मोती आपसूकच मिळाले. आमच्यासाठी ते संपूर्ण आयुष्याची शिदोरी आहे. कामाचा व्याप अन वयाची चाळीशी याउपरांत देखील ताजीतवानी अन हसतमुख असते. तिचा तजेलदार चेहरा अन पाणीदार डोळे मनाला प्रसन्न करतात. शिक्षणामुळे मला पुण्याला यावं  लागलं , म्हणून तो चेहरा जरी रोज पाहत नसलो तरी सकाळी-सकाळीच डोळे उघडताना तो समोर येतो. 

                 एरवी तिच्या दिवसाची सुरुवात आम्ही उठण्याअगोदर झालेली असते अन शेवट आम्ही झोपल्यानंतर. स्वयंपाकाच्या बाबातीत तर ती सुगरनच आहे. कदाचित तिच्या ह्याच गुणामुळे मला निरनिराळे स्वादिष्ठ, रुचकर पदार्थ खाण्याचा शौकीन बनवलंय. सुट्ट्यांमध्ये घरी गेल्यावर रोज नव-नवीन पदार्थांची रेलचेलच असते. आचरणाचे धडे देत असताना ती मला पदार्थ देखील बनवायला शिकवतेय. 
    
                 आयुष्य जगताना नेहमी सकारात्मक रहाव हेदेखील तिनेच शिकवलंय मला. ती नेहमी बोलत असते "आपण आपलं काम व्यवस्थित पार पाडायचं बाकीच्या गोष्टींचा विचार नाही करायचा, अन जर आपण ते काम चांगल्यासाठी आणि मेहनतीने केल असेल तर त्याचं फळ नक्कीच भेटेल आपल्याला". तिच्या साध्या बोलण्याने देखील एखादे काम पार पाडायची उर्जा येते. आमच्या वागण्यात तर कुठेच मौज-मस्तीची कमतरता नसते. हसत-खेळत तीसुद्धा आम्हा भावांसोबत लहान होते. ती जरी एक असली तरी तिची रूपं  अनेक आहेत.  अगदी लहान-लहान मुलांना पण ती हवी-हवीशी वाटते. तर आजी-आजोबांना तिची सेवा.त्यामुळेच ती आमच्या संपूर्ण नातेवाइकांत प्रिय आहे.  ती प्रसंगी माझी मैत्रीण देखील बनते. म्हणूनच काय ते मनात असलेली कुठलीही गोष्ट मी तिला सहजतेने सांगू शकतो,भले मी चुकलो असेल तर तेसुद्धा.
                 
              माझ्या लहानपणीची एक आठवण आहे.४-५ वर्षांचा असेल मी तेव्हा.  घरात टेबलावर पडलेले ५० पैशांचे नाणे मी न विचारता गोळ्या आणायला घेतले होते . नंतर तिच्या ते लक्षात आले होतेच. मार पडेल या भीतीने मी थरथरत होतो. पण तिने इतक्या प्रेमळ शब्दांत मला तेव्हा समज दिली होती, ती आजतागायत स्मरणात आहे. अन म्हणूनच ती माझ्या आयुष्याची गुरु आहे. 
               तिच्यासाठी जितकं लिहाव ते कमी आहे. फक्त मीच नव्हे तर प्रत्येकाची हीच भावना असते आपल्या आईच्या प्रती. जी आपल्या मुलाला चालायला , बोलायला,वागायला शिकवते . 


                खरं तर "आई " हि एक वृत्ती आहे ,
               अन  प्रत्येक घरात तिची मूर्ती आहे . 
               तिच्या मायेला तराजूच माप नसतं ,
                आपण न सांगूनही तिला सर्व कळतं . 
                ती आहे फक्त वात्सल्याची माउली 
               अन आयुष्यातील प्रत्येकाची शिक्षिका पहिली.   

Saturday, 1 August 2015

हमझा

हमझा
              बघता बघता पहिलं वर्ष कधी संपलं ते समजलं देखील नव्हतं. एका वर्षापूर्वी मोठ्या दिमाखात आलो होतो,केमिकल इंजिनियरिंग करायला.आता कुठे खरा प्रवास सुरु झाला होता. दुसरं वर्ष…अन तो पहिला दिवस होता. एक-दोघे सोडली तर मला कोणी ओळखीचं नव्हतं. सारं  काही नव्यानेच तर सुरु झालं  होतं. मी बरोबर ८:४५ च्या सुमारास वर्गात गेलो. बरीच मुलं आलेली होती कारण सर्व जण उत्सुक होते केमिकल चा 'क' शिकायला. मी थांबून कुठे जागा आहे का ते पाहिलं. सापडली… मी थोडासा जोरातच गेलो, तो बाजूला बसलेला होता. अजून तरी नाव नव्हतं  विचारलं. पहिल्या तासानंतर मग ओळख केली. ते नाव तसं  पहिल्यांदाच ऐकलं  मी "हमझा" मस्त वाटलं.
             दुसर्या दिवशी जेव्हा मी क्लास मध्ये गेलो तर रिकामी जागा शोधण्याऐवजी मी हमाझाची सफेद अन त्यावर जरीच्या ताराची नक्षी असलेली टोपी शोधली. अन बेंचवर बसताना हलकेच हसून विचारले "जल्दी आ गये भाई तुम आज?"उत्तरात मला एक स्मित मिळालं,जे आजही डोळ्यासमोरच आहे. अन मग एकाच सोबत असल्यामुळे आमचं बोलणं अजूनच वाढलं. जेव्हा कोणी अनोळखी असतं तेव्हा संवादाचा सु-संवाद व्हायला काही वेळ तर लागतो ना, तोच तो. नंतर मग प्रणव अन अजय पण आम्हाला सामील झाले. छान चतुर चौकडी बनली होती आमची. पुढे मग कुणाल सुद्धा. हसत खेळत अन आदल्या रात्री अभ्यास करत आमचं दुसरं वर्षपण वार्यासारखं भुर्रकन उडून गेलं.
              तिसरं वर्ष सुरु झालं, जसा अभ्यास वाढणार होता ,तशी आमची मैत्री सुद्धा घनिष्ठ होत गेली. पुढे अजून एक हिर्यासर्खा मित्र गवसला-सागर. सर्वच्या सर्व मदतीला धावून येणारे ,मला मित्र ह्या शब्दाचा खरा अर्थ त्यांच्यासोबत असताना उमगतो तिसर्या वर्षाच्या शेवटी आम्हाला ट्रेनिंग करायची होती. मग सर्व जण सोबत जाणे साहजिकच होते. अभिषेक अन अनिकेत देखील सामील झाले. खूप धमाल अन मस्ती केली. माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम ट्रीप झाली होती ती ("फिरस्ती" हा माझा मागचा लेख त्यावरच होता.)
              आम्हाला हमाझाचे 'रोजे' तसे नवे नव्हते. परामात्म्यापरी अपरंपार श्रद्धा अन कुठल्याही कामात स्वता:ला झोकून कस द्यायचं, हे हमाझाकडून शिकण्यासारखे गुण. मागे एकदा धर्मगुरुंचा कुठलासा कार्यक्रम आल्यामुळे त्याने एक पेपरच बुडवला. पण ह्या पठ्ठ्याने, पुढच्या परीक्षेत, झालेलं  खड्ड शिताफीने बुजलं.अन त्याच्या भाषेतली "थोडे बहोत "गुण आणलेत. आमच्यासाठी ते नक्कीच जास्त होत.
                ईद नुकतीच मागे गेली होती तेव्हा मग हमाझाने 'बिर्याणी अन शिरखुर्म्याचा' प्रस्ताव मांडला. एक दिवस ठरला. त्या दिवशी आम्ही सर्व सातही जण  हमझाच्या घरी गेलो. मी आत्तापर्यंत अनुभवलेल्या पैकी हा एक उत्तम पाहुणचार होता. त्याचे जीजू दिदि अन मम्मी मोठ्या प्रेमळ मनाने सारं  काही करत होते. (हमाझाचे वडील कुवैतला असतात , कामानिमीत्त. )थोड्या गप्पा झाल्यानंतर पंगत लगेच बसली.बिर्याणीचा सुगंध दरवळतच  होता  जणू वासानेच पोट भरावं इतका.
             महत्त्वाचं  म्हणजे कुणाल अन प्रणव बिर्याणी खात नसत, त्या दोघांसाठी  खास बनवण्यात  आलं होतं.सोबत असलेल्या शीरखुर्म्याची चव काही औरच होती. काजू बदाम पिस्ता चारोळी  अन त्यावरून त्याच्या  मम्मीच्या मायेचा  शिडकावा ती लज्जतदार चव अजून वाढवत होता. मन तृप्त कसे होते ,ते त्यादिवशी जाणवले . जीवनाच्या वाटेवर मला अजून खूप लोकं भेटतील ,त्यातील काही जवळची देखील होतील, पण आत्ता या वळणावर भेटलेला हमझा याआधीही नव्हता भेटला अन यापुढेही त्यासम कोणी भेटणार नाही, त्या संध्याकाळी खाल्लेल्या बिर्याणीची चव आजही माझ्या जिभेवर रेंगाळतेय.      
         

Tuesday, 21 July 2015

फिरस्ती...

फिरस्ती

              काही दिवसांपूर्वी, ट्रेनिंगला जायचं असा विषय नुकताच चालु झालेला होता. अन महाडला जायचं असं सर्वानुमते ठरलं. २९ तारखेच्या दुपारी १ च्या सुमारास आम्ही निघालो.

              दुसरी-तिसरी मध्ये असताना बालभारतीच्या पुस्तकात वाचलेलं कोकणाचं वर्णन आज प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. ती सर्वत्र असलेली लाल-तांबूस माती , आज तिचा स्पर्श पायांना जाणवला. उंचच-उंच असलेली ताडा-माडाची बंधुवृक्ष जणू आमच्या स्वागतास रस्त्याच्या दुतर्फा उभी होती. पुण्याहून निघाल्यावर साधारण ३०-४० किमी रस्ता दुपदरी होता अन त्यानंतर पुढे घाटाचा रस्ता सुरु झाला तर तो महाड येईपर्यंत. ताठ मानेने उभी असलेली डोंगररांग, अन तिने नेसलेली गर्द वनराई. त्यावर असलेली दाट धुक्याची दुलई. सारे काही नयनरम्य अन डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. त्या लांबवर पसरलेल्या डोंगररांगेवरून नजर हटत नव्हती.

               संध्याकाळी ६च्या सुमारास आम्ही मित्राच्या घरी पोहोचलो होतो. त्यांचीच एक वापरात नसलेली खोली आम्हाला रहायला देण्यात आली होती. रात्री जेवणानंतर आम्ही शतपावली करत महाडचे ऐतेहासिक चवदार तळे पाहिले. जे बाबासाहेब आंबेडकरांनी सामान्य जनतेसाठी खुले करण्यास आंदोलन केले होते.

              दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही किल्ले प्रतापगडावर कुच केली. वातावरण तर अगदी काल प्रमाणेच आल्हाददायक होतं. आजचा मार्ग वेगळा होता, पण वाट मात्र तिच होती , जुनी वळणावळणांची नागमोडी. तिच्याकडे पाहून आयुष्यासोबत तिची तुलना करावीशी वाटते.

              दुर्गम असलेला प्रतापगड केवळ पायथ्यापासून पाहिल्यास समजते स्वराज्य अभेद्द्य का होते . महाराष्ट्रातील एकूण एक किल्ला असाच डोंगर-दर्यात अन दुर्गम भागात वसलेला आहे.शिवाजी महाराजांनी उपलब्ध भौगोलिक परिस्थितीचा कल्पकतेने वापर केल्याचं समजतं. अन म्हणूनच पाऊण लाख पायदळ , हजारातालं हत्ती अन घोडदळ असून देखील धिप्पाड देहाचा अफजलखान चारी मुंड्या चित झाला होता. तो पराक्रम ह्याच प्रतापगडावर घडलेला."त्या" घटनेची साक्ष देत प्रतापगड ४०० वर्षांपासून तटस्थपणे स्वराज्याची ग्वाही देतोय. 

             गडाला पायर्या तश्या कमीच आहेत. सध्या पर्यटनासाठी किल्ल्याच्या डागडुजीचं देखील काम चालू आहे. किल्ल्याचं शत्रूपासुन रक्षण करण्यात महात्त्वचा वाटा असलेल्या "माची" आजही जुनी धमक बाळगून आहेत .अन त्यातल्या एका माचीवर उंचावर असलेला भगवा , स्वराज्यासाठी मावळ्यांनी  सांडलेल्या  रक्ताचं प्रतिक म्हणून दिवस-रात्र फडकतोय. प्रतापगडाला निरोप देऊन आम्ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड  हवेचं ठिकाण "महाबळेश्वर"ला निघालो. गडापासून केवळ १५-२० किमी अंतरावर ते वसलय. 

              पुन्हा नागमोडी  वळणाना  पार करत थोड्याच वेळात आम्ही  पोहोचलो. महादेवाचं स्वयंभू लिंग तिथे स्थापित झालय. त्याचं दर्शन घेऊन  पर्यटकांचं आकर्षण असलेले points  ला भेट देण्यास निघालो. Monkey point, Aurtherseat point ,Tiger spring point ,Echo point… असे खूप सारे बघण्या योग्य आहेत. त्यातही Aurtherseat point ला असलेलं दृश्य डोळ्यांचे पारणे फेडनारेच आहे. दूरपर्यंत जिथवर नजर जाइल तिथपर्यंत फक्त डोंगर अन घनदाट जंगल पसरलय. उन-वारा-पावसात देखील  डोंगरांनी स्वताचं सौंदर्य जपुन ठेवलय. पट्टीत ठराविक आकाराची झालेली झीज अन वरून ढगांची विरळ सावली त्याची शोभा  अजूनच वाढवतं . कॅमेरयात आणि डोळ्यात ते सारं मनोहर चित्र कैद करून आम्ही जवळच असलेल्या पाचगणीला भेट दिली. 

              आयुष्यात देखील असेच वळणं येत असतात अन माहित नसतं समोर काय आहे… निसर्ग हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे, ते उगीच नव्हे… 


Saturday, 27 June 2015

VISION

          डोळसपणा . . .
                आज नासिकहून पुणे जात असताना संगमनेरला बसमध्ये २अंध व्यक्ती बसलीत. बसली कुठे तर फक्त उभी होती.खरं तर जागाच नव्हती . मी सहज विचारले कुठे जातायेत तर "पुणे"असं उत्तर भेटलं उच्छ्वास टाकून मी बाजूच्या मुलाला जागा करण्यास बोललो अन तो माझ्या बाजूला बसला तर त्याचा मित्र पुढच्या सीटवर. 

               माझे कुतुहल जागे झाले होते . मला त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं होत. मग मी बोलत असता मला असेही समजले कि त्याचं फेसबुकवर "खातं" आहे. माझे हात नकळतपणे पुढे सरसावले अन  बंद केलेलं इंटरनेट चालु केलं . मी त्याचं नाव अगोदरच ऐकलं होतं त्यामुळे फक्त आडनाव विचारले. पण सर्च मध्ये मला फक्त डोळस लोकं  दिसत होती. मला त्याला सांगता पण येईना. तितक्यात त्याच्या खिशातून कसलासा आवाज आला. तर त्याने चक्क मोबाईल फोन काढला. हे मला सर्व अचंबित करणारे होते. माझ्या अंगाला अक्षरश: शहारे आले होते. 

               एव्हाना त्याचं  फोनवरील संभाषण झालं  होतं. तेव्हा तोच मला म्हणाला सापडत नसेल तर फोन नं. टाकून सर्च करा. त्याने त्याच्या आयुष्यातील कटू सत्य स्वीकारलं होतं . मी मग त्याला त्याच्या नावाप्रमाणे एक दोन प्रोफाईल वाचून दाखवल्या. त्याच्या महाविद्यालयाच नाव ऐकताच तो उदगरला "  हेच आहे माझं ". अन त्याच्या  चेहर्यावर एक  विलक्षन स्मित झळकत होते तेव्हढच माझ्याही. 

              त्याने मला त्याच्या प्रोफाईलवर असलेल्या फोटोबद्दल विचारणा केली.कसा आहे ? कुठला आहे? त्याच्या मित्राने ते सर्व करून दिलेलं होतं त्याने पुढे जोडलं. मग मी त्याला संपूर्ण वर्णन करून बोललो. आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. मग मी कुतुहलाने त्याच्या फेसबुक टाईमलाईन वर जरा फेरफटका मारला. अन त्याला बोललो मागच्या महिन्यात तुम्ही मुंबई गेलेलात का तर तो थोडासा अचंबित झाला. त्याला वाटलं  मला ते कसं समजलं असणार . त्याला कदाचित ते नवं  होतं पण तो त्याचा वापर करतोय ह्याचा मला जास्त आनंद झाला होता. आता मला तो अंध असल्याचे कुठल्याच बाजूने वाटत नव्हते.त्याने काही जागाच ठेवली नव्हती. अन त्याने नेहमीप्रमाणे तिकीट देखील व्यवस्थित काढलं .

              त्यांच्याबरोबर अजून काही सामान सुद्धा होते. मी त्याबद्दल विचारले असता त्याने मला सविस्तर  माहिती दिली . खरं  तर तो अन त्याची संपूर्ण टीम ऑर्केस्ट्रा चालवत होते. त्यांचा आज कार्यक्रम होता संगमनेरला. थोडक्यात  दुसर्या कोणावर अवलंबून  न राहता ते  स्वताच त्यांचा उदरनिर्वाह करत  होते. 

            तसं  बघायला गेलं  तर नकळतपणे  "त्याने" मला आयुष्याकडे वेगळ्याच  नजरेने बघण्याचा "दृष्टी"कोन दाखवला होता.