Tuesday, 30 June 2020

विठू माऊली


            आज आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चैतन्याचे वातावरण आहे , जरी दर वर्षीप्रमाणे पायी वारी जात नाहीये . कालपासूनच सर्वांच्या व्हाट्सएप स्टेटसला लालपरी झळकत आहे जी ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका घेऊन जात आहे . पंढरपूरची  वारी हा तसा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे . परदेशी संशोधक सुद्धा वारीचा अभ्यास करून गेले . मोठमोठे प्रबंध लिहिले गेलेत वारीवर . वारीतील शिस्तबद्धता , त्यातील नियोजन हे सारं नक्कीच आश्चर्यकारक आहे . 

             मात्र आज मी ज्या विठू माऊली बद्दल लिहितोय ती घरातील  आहे . माझे आजोबा , आईचे वडील कै . विठ्ठलराव माधवराव  पवार . आज ते ह्या ( स्वार्थी ) जगात हयात नाहीत . पण त्यांनी दिलेली शिकवण , त्यांच्या  आठवणी आजही तितक्याच ताज्या आहेत. तसं त्यांचं अन वारीचं खूप घट्ट नातं होतं . ऐन तारुण्यात त्यांनी पंढरपूरची वारीची परंपरा सुरु केली होती . ती शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी जपली . जवळजवळ 45 वर्षे त्यांनी नित्यनेमाने वारी केली . अन मी स्वतःला तितका  भाग्यवान समजतो  कि मला त्यांचा सहवास लाभला होता . मी पंढरपूरला क्वचितच एकदा गेलेलो , ते सुद्धा सहल म्हणून . पण मला त्याचं कधी दुःख वाटलं नाही . कारण मी जिवंत विठू माऊली चे दर्शन घेत होतो माझ्या आजोबांच्या रूपात . 
             
            त्यांचं संपूर्ण आयुष्यच एक आदर्श होतं . लोकसेवेला  वाहून दिलेलं . साधारण 80 च्या दशकापासून ते गावचे सरपंच म्हणून 15 वर्षे बिनविरोध निवडून आले होते इतकी त्यांची लोकप्रियता होती . गावातील मुलांना शाळेसाठी दुसऱ्या गावात जावं लागायचं , त्यांनी ती अडचण बघून गावात शाळा देखील उघडली त्यांच्या वडिलांच्या नावाने . घरातील मोठा मुलगा  म्हणून त्यांनीच सर्वांचं पाहिलं . पण मोठे  असल्याचा कधी काडीमात्र  गर्व केला नाही . एकत्रित  कुटुंबाचा संसाराचा गाडा ओढताना किंवा संपूर्ण गावचा कारभार सांभाळताना त्यांनी रोजचा हरिपाठ कधी चुकवला नाही . त्यांच्या पांडुरंगाच्या भक्तीत श्रद्धा होती , अंधश्रद्धा मात्र कधी दिसली नाही . विज्ञानाची कास धरूनच ते चालत . ज्ञानेश्वर माऊली , तुकाराम महाराज , सावता माळी ह्या संतांनी दिलेल्या शिकवणी प्रमाणेच त्यांनी आधी स्वतःच्या कामात , शेतीत पांडुरंग पाहिला  . वर्षभर अविरत न थकता ते  काम करायचे अन मग आषाढी -कार्तिकी एकादशीला वारी करून विठ्ठलाच्या दर्शनाला जायचे . 

             वयाच्या साठीत  सुद्धा वारी करून ते आल्यावर  आम्ही त्यांना भेटायला जायचो ,त्यांच्या  चेहऱ्यावर  प्रचंड उत्साह ओसंडून वाहायचा . वारी करून आल्याचा त्यांचा थकवा आम्हाला तिळमात्र जाणवत नसायचा . खरे तर शाळेत सर्वच गोष्टी कधीच शिकवल्या जाऊ शकत नाहीत . संस्कारांचे मोती हे घरातूनच एका पिढी मार्फत दुसऱ्या पिढीला दिले जातात . आजही आजोबांनी आम्हाला दिलेली शिकवण हि आयुष्य जगण्यात कामी  येतेय . त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दर वर्षी गावावरून जाणाऱ्या दिंडीला अन्नदान केले जाते . मला त्यांच्यावर लिहिण्यासाठी एक  पुस्तक कमी पडावे असे त्यांचे आयुष्य होते , इतरांसाठी वाहिलेले . चंदनासारखे स्वतः झिजून इतरांना सुगंधित करणारे . 

           आज त्यांच्यावर थोडक्यात लिहिण्याचा एकच उद्देश होता , जसं  मला माझ्या आजोबांमध्ये विठू माऊली  दिसली , तसेच आपल्या इतरांच्या आयुष्यात देखील  अशाच विठू माऊली आहेत . त्या सर्वांच्याच घरात असतात खासकरून आजी-आजोबांच्या रूपात . तर त्यांना आपण जपलं पाहिजे , त्यांचा आयुष्य जगण्याचा अनुभव दांडगा आहे आणि तोच अनुभव आपल्याला आयुष्याची शिदोरी म्हणून वापरायचा आहे .

          साधं उदाहरण आहे , लॉकडाउन मुळे घरात बसून सर्वच जण कंटाळलेले असणार , तेच तेच सिनेमे , सिरीयल पुनः प्रसारित बघून . पण ज्यांच्या घरात आजही आजी-आजोबा आहेत त्यांना मात्र हे कधीच कंटाळवाणं वाटलं नसणार . एकत्र कुटुंब असलेल्याना त्याचा  चांगला अनुभव येतो . 

            कोरोनामुळे देवळातील माऊली  भेटली नाही म्हणून काय होतं  , घरातील माऊली चा आशीर्वाद घ्या , त्यांना प्रेम द्या  . 'तो' नक्कीच  कंबरेवर हात ठेवून बघतोय तुमच्याकडे !

No comments:

Post a Comment