Tuesday, 10 March 2020

अप - स्पर्श

अप - स्पर्श

               परवाच  जागतिक महिला दिन मोठया  दिमाखात पार पडला . सर्वीकडे महिलांच कौतुक करण्यात आलं , अन एक दिवसाचा सोहळा संपन्न झाला .
               मी कामानिमित्त काही दिवस समीरवाडी  , कर्नाटक येथे होतो . काल संध्याकाळी तेथून निघणे झाले . कोल्हापूर साठी शेवटची बस होती ६ वाजता . त्यामुळे तुंबळ गर्दी झाली होती बसमध्ये . तिकडे कर्नाटक मध्ये अजून सुद्धा ३x २ च्या आसन व्यवस्थ्येच्या बस आहेत , तरीसुद्धा बरेच लोकं  उभी होती. नशिबात असल्यामुळे मला खिडकी जवळील सीट भेटली ( खूप कमी फळफळतं  माझं नशीब ). आणि बाजूला एक मुलगी बसली . बहुदा कॉलेज जाणारी असावी , युनिफॉर्म होता . अन तसल्याच युनिफॉर्म मध्ये अजून काही मुले देखील होती . खूपच गर्दी असल्यामुळे बसायला मिळालं  नव्हतं  त्या मुलांना . पण बस पुढे जाताच त्या मुलीला अस्वस्थ वाटू लागलं , मला ते लगेच जाणवला म्हणून मी खिडकी जवळ सरकलो , तशी लागलीच तीपण सरकली . अन बाजूला उभा असलेला मुलगा देखील ....
               आता मला तिची अस्वस्थता समजायला उशीर नव्हता लागला . मी त्या मुलाकडे एक कटाक्ष टाकला , त्यानेही माझ्याकडे पहिला . पण त्याच्या डोक्यात तेव्हा भलतेच विचार होते . बस जशी चालताना धक्के घेत चालत होती , तसे तोही बस मुळेच धक्के घेत शरीर हलवत होता , जणू काही तो जाणून बुजून काहीच करत नव्हता  , अन ते सर्व आपोआप घडत होत.
              त्या मुलीला अप-स्पर्श करण्याचा त्याचा प्रयत्न केव्हापासून चालूच होता . एव्हाना मी कानडी नाही हे त्या मुलीच्या लक्षात आलं असावं , म्ह्णून ती मला देखील काही बोलली नाही . अन मी देखील त्या मुलाला इच्छा असून काही बोलू शकलो नव्हतो . मी बोललेलं मराठी / हिंदी त्याने  समजून  न समजल्यासारखं केल असतं .
मग मी त्या मुलीलाच माझ्या जागेवर बसण्याचं इशार्याने सांगितलं . तस ती खिडकी जवळ बसली अन मी तिच्या जागेवर . तिच्या चेहऱयावर विलक्षण सुटकेचा एक निश्वास दिसत होता , तर त्या मुलाला देखील समजलं होत मी काय  अन का केलाय ते !
               शेवटी त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता . अन नंतर माझ्या असे लक्षात आले , कि रस्त्यात बरेच खड्डे , गतिरोधक असताना देखील त्या मुलाचा मला स्पर्श देखील झाला नाही ... आश्चर्य कारक .
त्या घटनेत माझा एक प्रयत्न होता कि त्या मुलीला जो काही अप-स्पर्श होत होता , तो रोखला गेला पाहिजे . अन मला त्याच समाधान होत कि तो यशस्वी झाला होता . नुसता एक दिवस महिला दिन साजरा करून पुरे आहे का ? स्त्रिया ह्या रोज सन्मानास पात्र नाहीत का ? मला जो अनुभव आला तसा  अप-स्पर्श दररोज कोणीतरी अनुभवत असणार आहे . पण त्यातून त्यांची सुटका होते का ? किंवा हाच अप-स्पर्श वाढत जाऊन पुढे नको त्या घटना घडण्यास कारणीभूत ठरतो .
                सध्या ह्या विषयावर खूप आहे बोलायला , लिहायला पण इतकाच मांडता येईल , जे काही वर्षांपूर्वी 'निर्भया ' हत्याकांड झालं होतं  किंवा ' हिंगणघाट ' येथे झालेली घटना खूप क्रूर होती . जितका दोषी क्रूर कर्म करणारा आहे तितकाच दोषी त्या गुन्हेगाराला  पाठीशी  घालणारा नाहीये का ?किंवा तितकाच दोषी , समोर घटना घडत असताना देखील फक्त बघ्याची भूमिका घेणारा नाहीये का ? आजकाल घटना घडल्यानंतर तिचा व्हिडीओ व्हायरल करण्यात धन्यता  मानणारी लोक जास्त दिसताय . किंवा गुन्हा सिद्ध होऊन देखील कायद्याच्या पळवाटा शोधून त्यांना फक्त काही पैस्यां करीता    वाचवणारी मानसिकता आहे .
हे कुठेतरी थांबायला हवं किंबहुना थांबवायला हवं ... नाहीतर रोज कोणीतरी असा अप-स्पर्श करत राहील अन पुढे त्याच अप-स्पर्शच रूपांतर वाईट घटनेत होईल . तिथे जोपर्यन्त स्वतःच्या घरातली स्त्री नसेल तोपर्यन्त  हे असेच चालू राहणार का ???

Monday, 7 October 2019

आजचे आधुनिक सीमोल्लंघन

             उद्या दसरा आहे . परंपरेनुसार अनादी काळापासून  हा  सण / उत्सव साजरा केला जातोय . त्यातल्या दोन महत्त्वाच्या कथा , एक म्हणजे देवीचा राक्षस प्रवृत्तीवर झालेल्या विजयाचे प्रतीक तर दुसरी म्हणजे राम- रावणाचे युद्ध  ह्याच दिवशी संपन्न झाले आणि प्रभू श्रीरामांनी विजयश्री आणली. म्हणून ह्याच दिवशी भारतात सर्वत्र रावणाच्या पुतळ्याचे देखील दहन केले जाते . हि वरील आख्ययिका जवळपास  सर्वानाच ज्ञात आहेत. त्याव्यतिरिक्त अजून काही कथा आहेत त्यानुसार दसऱ्याच्या दिवसाचे महत्त्व आहे .

             पांडवांनी अज्ञातवास संपवून शक्तिपूजन शमी वृक्षाच्या ढोलीत ठेवलेली  शस्त्रे  परत घेतली आणि कौरव सैन्यावर विजय मिळवला  तो ह्याच दिवशी.
महाराष्ट्रातील वीर मावळे मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या-नाण्याच्या रूपाने संपत्ती घरी आणत .  असे हे  विजयी शिलेदार मोहिमेवरून परत आले कि दारात त्यांना घरातील स्त्रिया ओवाळीत असत . आणि त्याचेच प्रतीक म्हणून  आज  आपण  आपट्याची पाने सोने म्हणून दसऱ्याला एकमेकांना वाटून तो सोहळा साजरा करतो .
दसरा ह्या सणाला कृषीविषयक देखील महत्त्व आहे . पावसाळ्यात पेरलेले  पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत असत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या मातीवर नऊ धान्याची पेरणी करतात आणि दसऱ्याच्या दिवशी त्या धान्याचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात .  नवरात्रीत होणाऱ्या चक्रपुजा हा देखील त्याच परंपरेचा एक भाग आहे .

             अगदी माझ्या लहानपणीची गोष्ट , साधारण २००० वगेरे साली . दसऱ्याच्या दिवशी सकाळी उठून घराची साफसफाई करायची , गाडी - सायकल स्वच्छ धुवून चकाचक करायची . ( याच दिवशी पूर्वी सरदार लोक आपली शस्त्रे उपकरणे साफ करून त्यांची पूजा करीत असत . शेतकरी , कारागीर हे आपली नांगर , आऊते , हत्यारे ह्यांची पूजा करतात . ) वडिलांसोबत गावठाण जंगलात जायचं , तेव्हा प्रत्येक गावाचे असे जंगल राखलेले असायचे . काही खेड्यात अजूनही आहेत . जंगलातून आपट्याच्या झाडाची फांदी घ्यायची आणि पुन्हा घरी यायचं . दारात आई पूजेचं ताट घेऊन तयार असायची . आई ताट ओवाळायची तशी मान देखील गोल फिरवण्यात वेगळीच मज्जा होती . थोडं मोठं झाल्यावर समजलेलं त्याला "सीमोल्लंघन" म्हणत असत . आपट्याच्या फांदीची पाने लहानग्या खिश्यात कोंबायची आणि गावभर 'सोन ' वाटत हिंडायचं . सगळीकडे नव-चैतन्याचे वातावरण असायचं .

            नंतर जसजसे मोठं होत गेलो तसतसे 'पर्यावरण ' हा शब्द उमगत गेला , अभ्यासातून , वर्तमानपत्रातून ( बरं  झालं त्यावेळी  फेसबुक  किंवा व्हाट्सअँप  नव्हतं . ) खेड्यातून तालुक्याला घर बदलले . आधी सहज सीमोल्लंघन करून लुटून आणलेलं सोनं ( आपटयाची पाने ) आता बाजारातून विकत आणावं लागत असे . जणू काही आपण सोन नव्हे तर सोन विकणाराच आपल्याला  लुटतो . त्यामागची अर्थकारण आणि पर्यावरणीय कारणे देखील तशी वेगळी होती . हा सर्व बदल डोळ्यांदेखत घडत गेला . आजही त्याच बदलातून जातोय आपण . आधी गावभर  फिरून घरोघरी जाऊन सोने वाटत होतो , आता नेटभर सर्फ करून प्रत्येकाच्या वॉल /ग्रुप वर सोने उपलोड करतोय आपण . लहानपणी झाडाची एक फांदी तोडली जात होती तर दुसरी दोन झाडे लावून जगवली देखील जात होती .  आज तसं होतय  का ?  फक्त लाईक्स  आणि हॅशटॅग ट्रेंडिंग व्हावा किंवा ह्या गोष्टी सोशियल मीडिया वर पसरवल्या म्हणजे आपण 'कूल ' आहोत काळासोबत चाललोय असा गोड  गैरसमज  पसरलाय .

             अगदी जवळचेच उदाहरण आहे , मुंबईतील मेट्रो च्या  कार शेड साठी आरे  कॉलनी तील जंगलचा काही हिस्सा ग्रहण करण्यात आलाय . काल - परवा अंधारात झाडे तोडायला सुरुवात देखील झाली . खूप लोकांनी आंदोलने केली , ट्विटर , फेसबुक , व्हाट्सअँप सर्वीकडे शेयर देखील करण्यात आलं . आरे वाचवा हॅशटॅग पण ट्रेंडिंग झाला . पण 'आरे वाचवा' म्हणनाऱ्यांची 'आरोळी ' फक्त आरे पुरतीच मर्यादित हवीये का ? सर्वच बाबतीत बदल नको का घडायला ?लहान पणी जस आपण आपटयाची पाने वाटत फिरत होतो तसं  आता फिरलो तर ?
बदल फक्त इतकाच करायचंय , ह्यावेळी जिवंत झाडाची पाने न तोडता जिवंत झाडाच्या बिया वाटायच्या  !!!

           फेसबुक वर २००० मित्र आहेत , प्रत्येकाच्या वॉल वर फोटो उपलोड करण्यापेक्षा प्रत्येकाला २-२ बिया वाटल्यास नाही का घडणार बदल ? ( आरे जंगलाची किती झाडे तोडलीत , का तोडलीत , कोणाची परवानगी वगेरे  हा सर्व न्याय्य प्रविष्ठ विषय आहे , त्यात हात नको घालायला . आपण प्रत्यक्षात काय केलाय आणि काय करायला हवं हे बोललेलं कधीही योग्यच . ) सोशिअल  मीडिया वर  फक्त हॅशटॅग ट्रेंडिंग करण्यापेक्षा  प्रत्यक्ष  जीवनात आपण ह्या नवीन गोष्टी देखील ट्रेंडिंग करू शकतोय ना ? ह्या आजच्या आधुनिक सीमोल्लंघनाचा बदल घडावा हा प्रयत्न फक्त एकाने नव्हे तर सर्वांकडूनच अपेक्षित आहे . 

Saturday, 26 August 2017

हि तर 'स्त्रीयांची ' इच्छा

              दर वर्षीप्रमाणे ह्या  वर्षीसुद्धा अगदी काठावर  सुट्टी मिळाली  , गणेश चतुर्थी साठी .  १७-१८   तासांच्या  प्रवासा नंतर घरी पोहोचलो . आल्यावर लगेचच घरातल्या गणेश मूर्तीची  प्रतिष्ठापना केली . मंडळाच्या गणपतीची तयारी बघायला निघालो तर समजलं कि ह्यावेळीचा गणेशोत्सव  थोडा  वेगळा आहे . अध्यक्षांपासून  खजिनदारापर्यंत सर्व जबाबदारी महिला मंडळाने लीलया पेललीये . अगदी वर्गणी गोळा करण्यापासून सर्वच महिलांनी हिरीरीने भाग घेतला . देणगी  देणार्याला पण विश्वास होताच कि दिलेली देणगी सत्कारणी लागणार म्हणून . एरवी  घरातलं बजेट काटेकोरपणे सांभाळणाऱ्या ह्या स्त्रिया हेदेखील बजेट  सांभाळू शकतात यात तिळमात्र शंका नाही . 

            मी अगदी लहान  असल्यापासून बघत आलोय , मूर्तीची प्रतिष्ठापना असो  किंवा इतर कामे  आदी सर्व गोष्टी पुरुष मंडळी , तरुण मुले बघत असत . किंबहुना  तथाकथित पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे सर्वत्र हेच बघावयास मिळते . साहजिकच सर्व बाबतीत त्यात पुरुषांचा उजवेपणा दिसू लागतो किंवा अहम दिसतो . 
कर्कश आवाजात गाणी वाजवणे हा त्यातलाच एक प्रकार . काळाच्या ओघात सुमधुर गणपतीची गाणी , आरत्या बाजूला सारून तिथे "मुन्नी बदनाम" होत असते. वाटतच नाही गणपती बसलेत कि 'कार्य(न )कर्ते '  पार्टी करायला बसलेत .

            स्वखुशीने , यथाशक्ती वर्गणी जमा करण्याचे दिवस आता मागे पडलेत . २० - २५ कार्य(न)कर्त्यांची  'गॅंग ' घरात घुसून अपेक्षित असलेली रक्कम भेटल्याशिवाय  न सोडणारी . मूर्ती , इतर शोभीकरण , देखावे  करून उरलेले  वर्गणीचे पैसे स्टेज खालीच बसून पत्ते  खेळणे  अन तत्सम कारणांसाठी  उडवले जातात . ह्या गोष्टींची इतरांना देखील कुणकुण असते पण त्यावर भाष्य करण्यास  तयार  नसतं . कारण  मंडळ राजकीय पक्षांच्या कुठल्यातरी भाऊ - दादा - आबांच्या अखत्यारीत असतं . अन गणपतीपेक्षाही त्यांचाच 'वरदहस्त ' जास्त मोठा असतो . 

           लोकमान्य टिळकांनी ह्यासाठी  कधीच सार्वजनिक गणेशोत्सव सुरु  केला नव्हता . त्यांचा उद्देश  लोकांनी एकत्र यावे , बाहेर पडून इंग्रज सरकार विरुद्ध लढा देणे हा होता . आज त्याच्या वास्तवाने वेगळेच रूप धारण केले आहे . युद्ध आज देखील संपले नाहीये , भ्रष्टचारा विरुद्ध अन प्रत्यक्ष गणेशाच्याच नावाखाली चाललेलं . कुठेतरी , कधीतरी हे थांबायलाच हवं ना ?

           आज भारतातील 'स्त्री ' जर राष्ट्रपती बनून देश बघते , एक स्त्री बुलेट ट्रेन चालवते , मग गणपती मंडळ का नाही ? एक संधी तर देऊन बघा , बदल आपोआप जाणवेल कारण हि तर 'स्त्रीयांची ' इच्छा आहे   . दुसऱ्याकडे बघण्याआधी सुरुवात स्वतःपासून करा . स्वतः टिळकांनी देखील ' आधी केले मग सांगितले ' .  

Sunday, 23 April 2017

वाढती यांत्रिकता कितपत योग्य ?

               साधारण ४-५ दिवसांपूर्वीची घटना असेल . बर्याच दिवसांनी मित्रांना भेटण्याचा 'योग' जुळून आला होता . एका मॉलमध्ये एकत्र जमलो . गप्पांच्या ओघात वेळ कसा चालला होता तेही कळत नव्हतं . आम्ही वरच्या मजल्यावर बसलो होतो . अचानक ओरडण्याचा आवाज आला . तोच सरशी सगळे उठून  काय झाले ते बघायला गेले . (मॉल मध्ये 'मध्यवर्ती ' भाग हा सहसा पूर्णपणे मोकळा असतो . ) ५ मिनिटे खाली वाकून पाहिल्यावर समजले - एका लहान मुलाचे हाताचे बोट " यांत्रिक जिन्यात " - एस्कलेटर मध्ये अडकले .

              जिवाच्या आकांताने तो कळवळत होता . त्याची आई त्याला कवटाळून होती . त्या क्षणाला कोणीही मदतीला गेले नाही मात्र पटापट 'स्मार्ट फोन' वर चित्रित करणे सुरु झाले . इतकी तर आजकालच्या माणसाची माणुसकी उरलीये . स्मार्टफोन वापरता वापरता माणसाचा स्वतःचा स्मार्टनेस मात्र कधीच हरवलाय .'सोशल ' मीडियावर फोटो अपलोड / शेयर  करून दुःख 'सोसणाऱ्याच्या ' वेदना कधीच  कमी नाही होत ,उलटे त्याचे फक्त 'शोषणच' होते   . महत्त्वाचं फक्त ,त्यांनी  फिरणाऱ्या जिन्याची मोटार मात्र लगेच बंद केली . पण तेवढ्याने त्याच्या वेदना थांबल्या  नाहीतच . २० मिनिटे त्याचा हात तसाच होता ,तेव्हा कुठे ऑपरेटर आला अन त्याने हात मोकळा केला .

               मानवी आयुष्य सुलभ व्हावे यासाठीच खरे तर यंत्रांचा शोध लागला .अन कालानुरूप त्याचा वापर वाढता  झाला . पण वाढती यांत्रिकता कितपत योग्य आहे ? याचा मात्र विचार करायला हवाच . झालेल्या घटनेत मुलाला दोष देणे बिलकुल चुकीचे आहे . मस्ती करणं , उड्या  मारणं हा लहान मुलांचा गुणधर्मच . पण पालकांना मात्र कळायला हवे , मुलांना खेळायला , बागडायला उद्यानात न्यावे न कि  मॉल मध्ये 'प्ले -स्टेशन 'वर .

          धावपळ करण्याच्या नादात माणसाने कृत्रीमपणा  अन यांत्रिकता निवडली . पण त्यांच्यामुळे उद्भवणाऱ्या गोष्टींचा उपाय फक्त अखंड निसर्गात आहे. २०व्या मजल्यावर घर - मग खाली उतरण्यासाठी लिफ्ट - पार्किंगहुन एसी कार मधून मॉल मध्ये यायचं अन इकडे पुन्हा एस्कलेटर. कुठे कुठे जरा चालणे नको . अन मग ह्या साऱ्या गोष्टींमुळेच रक्तदाबाचा त्रास सुरु झाल्यावर , व्यायाम करायला महागडी 'ट्रेडमिल ' घरात आणून ठेवणार . फक्त यासाठीच मेहनत करून पैसे कमवायचेत का ? यातली आर्धी यांत्रिकता जरी टाळली तरी ट्रेडमिल चा खर्च देखील वाचेल अन आयुष्य पण सुरळीत असेल . याचा कुठेतरी प्रत्येकानेच विचार करायला हवा !!

Wednesday, 8 March 2017

'प्रतिज्ञा'

अगदी परवाचीच गोष्ट . संध्याकाळी चहा घेण्यास बाहेर निघालो . हातात सवयीप्रमाणे मोबाईल. २१व्या शतकात मानवाच्या मूलभूत गरजा वाढल्या आहेत. तुम्हा-आम्हा सर्वसामान्याच्या हातात अगदी सहजपणे आढळतो . फक्त कोण त्याचा कसा वापर करून घेतो यावर ते अवलंबून असतं . (अर्थात मोबाईल शाप कि वरदान हा खूप मोठा विषय  आहे ,त्यावर आज भाष्य नाही . )
चालत असतानाच मला कोणीतरी पाठी मागून आवाज दिला "ए दादा थांब ". अन एक मोपेड माझ्या बाजूला येऊन थांबली . साधारण तिशीतली एक महिला होती. सुरुवातीला मला समजले नाही . पण नंतर उमगले माझ्या हातातला मोबाईल पाहून त्यांनी मला थांबवलं . त्यांनी सुद्धा त्यांचा मोबाईल हातात घेत माझ्यापुढे केला . हे सारं  घडत असतानाच मी त्यांच्याकडे पाहत होतो .( वस्तुतः आपल्या तथाकथित पुढारलेल्या समाजानेच तसले 'संकेत ' पाडले आहेत . कपाळावर कुंकू किंवा टिकली नाही म्हणजे -वैधव्य . )
एकंदरीत त्यांचा संसाराचा गाडा त्या एकट्याच हाकत होत्या . त्यांनी मला त्यांचा मोबाईल देत विचारलं . "कसलं तरी 'अकाउंट' येतय बघ यात. त्यामुळे माझं इंटरनेट चालू नाही होतेय अन मला व्हिडिओ बघता नाही येत
". मी मोबाईल हातात घेताच मला लक्षात आलं  होतं  काय झालय ते. अन लगेच इंटरनेट चालू देखील केलं. त्या लागलीच  'थँक्स ' म्हणाल्या .त्या पुढे बोलल्यात कि मला ब्लॉऊजच्या  वेग-वेगळ्या   डीझाईन   बघायला लागतात . आता मात्र सारं  चित्र स्पष्ट झालं  होतं .
अकाली वैधव्य पदरी पडले म्हणून निराश न होता  किंवा केवळ रडत न बसता 'ती ' उभी राहिली . तिच्या स्वताच्या पायावर . अन मी  मनात हा विचार करत असतानाच नकळतपणे '  नतमस्तक ' झालो . अर्थात आज महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर खूप सार्या यशस्वी स्त्रियांबद्दल बोललं जाईल त्यांचं कौतुक होईल . पण समाजात 'तिच्या'सारख्या खूप सार्या स्त्रिया आहेत .  योग्य पाठींबा न मिळाल्यामुळे मागे राहतात .
जर खरंच तुम्हाला 'महिला दिन ' साजरा करायचा असेल तर ज्या स्त्रिया केवळ साथ न मिळाल्यामुळे अन मार्गदर्शन न भेटल्यामुळे मागे राहतात त्यांना केलेली मदत खूप लाखमोलाची ठरेल .

दुनिया टपली आहे  संपवण्यास तुला
तेव्हा खचू नकोस
अन्यायाविरुद्ध लढा दे तू

एका ठिणगीची मशाल हो तू
जीवन सर्वांचे उज्ज्वल करण्या

येति अखंड संकटे तुझ्या वाटी
घे हाती समशेर
दैत्याचा वध  करण्या

शिक्षणाचा वसा घे हाती
ज्ञान सर्वांना  वाटण्या

उभी राहा स्वताच्या  पायी
हे सारे विश्व तारण्या

तुझ्याविन जग नाही हीच आजची 'प्रतिज्ञा' 

Wednesday, 18 January 2017

दिवार - ए - इन्सानियत

 माणुसकीची भिंत

दरवर्षीप्रमाणे ह्या वेळेसही थंडीचा तडाखा कायम आहे. हिवाळा सरत आला , नुकताच सूर्याने मकर राशीत देखील प्रवेश केलाय . पण हा हिवाळा मात्र थोडा वेगळा आहे . कामानिमित्त माझे नाशिक ,पुणे  इथे चक्कर झालेत अन घरी मालेगावी सुद्धा . ह्या सर्व ठिकाणी मला एक गोष्ट आढळली ,जी तुम्हीसुद्धा नक्कीच पाहिली असणार - "माणुसकीची भिंत "

जे नको असेल ते ठेवून जा अन जे हवे असेल ते घेऊन जा . असा संदेश देणारी . फूटपाथवर झोपणाऱ्याना किंवा गरीब लोकांना कि ज्यांना एकावेळेच्या जेवणाची भ्रांत असते त्यांना उब देणारी . गरीब-श्रीमंतांच्या 'दरीबद्दल ' सर्वच बोलतात किंबहुना सर्वांना परिस्थिती चांगलीच ठाऊक आहे . (त्याबद्दल आत्ता  भाष्य नको. )फक्त "फॅशनच्या " नावाखाली किंवा "ट्रेंड " म्हणून दरवर्षी नव-नवीन कपडेलत्ते , स्वेटर्स  घेणारे दरीच्या उंच टोकावर आहेत . अन कुटुंबातल्या एकही सदस्याचं 'धड' धडपणे झाकण्याची ऐपत नसणारे दरीच्या पायथ्याशी . हीच मानसिकता बदलण्यासाठी नोव्हेंबर २०१६ मध्ये नागपूर येथील एका शाळेने प्रयत्न केला . अन भारतात "माणुसकीच्या भिंतीचा " पाया घातला.

नको असलेले अन जास्तीचे कपडे घरात साठवून ठेवण्यापेक्षा किंवा इतरत्र फेकण्यापेक्षा  तिथे ठेवून द्यायचे जेणेकरून ज्यांना त्याची गरज  त्यांना ते वापरात येतील. जगातील काही लोकांनी माणुसकी जरी सोडली असली म्हणून सर्वांनीच  सोडलीये असं नाही . अन म्हणूनच पाहता पाहता त्या भिंतीचा प्रसार झाला ,त्या योजनेला प्रतिसाद मिळाला . ज्ञानेश्वरांनी भिंत चालवल्याचे फक्त ऐकण्यात आहे पण आजच्या काळात हि भिंत चालवणे खूप महत्त्वाचे आहे . ह्या भिंतीची चालदेखील तितकीच क्रांतिकारी असणार आहे . आज संपूर्ण भारतात पसरलेल्या ह्या भिंतीचे मूळ पाकिस्तानात आहे . ( ज्याप्रमाणे भारतातील प्रत्येक मुसलमान हा भारतविरोधी नाहीये  त्याप्रमाणेच पाकिस्तानात देखील चांगले लोकं आहेत !)

रोहयाल वरिंद नावाच्या एका मुलाने वयाच्या १५व्या वर्षी हि कल्पना आमलात आणली . कपडे ,औषध-गोळ्या , जेवणाची सोय ह्या सर्व गोष्टी त्याच्या डोक्यात होत्या. पाकिस्तानातील फैसलाबाद येथे फेब्रुवारी २०१६ मध्ये त्याची सुरुवात झाली . अन आज त्याच्या ह्या छोट्याश्या कल्पनेला जागतिक स्वरूप प्राप्त झालय .तात्पर्य एकच , कुठल्याही गोष्टीची सुरुवात हि स्वतःपासून करावी लागते ,त्यानंतर तिचं  स्वरूप नक्कीच विस्तृत होणार .
भारतात सुरु झालेली हि भिंत फक्त हिवाळ्यासाठीच मर्यादित न राहता ती इतर सोयींसाठी देखील आमलात
आणायला हवी .

(हा लेख वाचणाऱ्यांना माझं एकच आवाहन आहे , जर तुमच्या परिसरात हि भिंत नसेल तर स्वतः पुढाकार घेऊन तुम्हीदेखील ती उभी करू शकता . ) 

Saturday, 6 August 2016

खेळ मांडियेला ... नव्याने


                   आज शनिवार असल्यामुळे ऑफिस ४ वाजता सुटलं. निघत असताना खिडकीतून खाली  किलबिल आवाज येत  होता  . डोकावून पाहिले असता बाजूच्या कॉर्पोरेट ऑफिस  मधले कामगार सुटाबुटात खेळत होते. अचंबित त्या गोष्टीचे नव्हते कि ते खेळत होते , ते जो खेळ खेळत होते त्याचं वाटलं . २ चुनखडीच्या रेषा साधारणपणे १०० मीटर अंतरावर होत्या. एका रेषेच्या आतल्या बाजूस ७/८ कामगार ( जे आज खेळाडू बनले होते .) उभे होते . त्यांच्या हातात वापरात नसलेल्या सायकलचे चाक होते अन दुसर्या हातात एक काठी. 
                   समोरील ते दृश्य पाहून मी क्षणभर स्वतःला विसरलो . पुढच्या क्षणी डोळ्यासमोर होते ते माझ्या प्राथमिक शाळेचे पटांगण . आई खेळायला निघालो गं .... अशी जोरात आरोळी बाहेरूनच द्यायची ,जेणेकरून  स्वंयपाकघरात आवाज पोहोचेल. बाहेर मित्रांचा कंपू उभाच असायचा. थोड्याच वेळात सर्वजण पटांगणात भेटायचे . गावाच्या चोहीकडे भेट द्यावी अशी स्थळे होती. कधी तलावा पलीकडील गणपती  मंदिर , तर कधी हिरवा गालिचा ओढवून नटलेली टेकडी . कधी शासकीय विश्रामगृह परिसरातील उद्यान , तर कधी एखाद्या मित्राच्या शेतातील वनभोजन . शिवबाने जशी मावळ्यांना घेऊन एक-एक स्थळे , गड-किल्ले काबीज केलेत तसेच आम्हालाही वाटे . फरक इतकाच कि त्यांच्याकडे घोडदळ होते , तर आमच्याकडे कधी सायकल किंवा कधी फक्त तिचे चाक अन काठी . 
                   साधारणपणे सुट्टीच्या दिवशी हा दौरा असायचा . इतर दिवशी शाळा सुटल्या- सुटल्या रस्त्याने घरी येत असतानाच आज काय खेळायचे याचा बेत आखला जायचा . क्रिकेटची बॅट  घेण्याइतपत कोणाचा गल्ला नव्हता जमलेला , म्हणून एका फळीने काम भागवले जायचे . ( मुळात म्हणूनच क्रिकेटला मराठीत 'चेंडू - फळी ' बोलतात . अन मराठी फळीला जेव्हा इंग्रजीचा 'शेप ' येतो तेव्हा ती 'बॅट ' होते . ) . कधी दाराच्या मागील सान्यात ठेवलेली विट्टी दांडूचा डाव रंगायचा तर कधी भोवऱ्याची जागतिक स्पर्धा भरायची ( त्याच भोवऱ्याचे मॉडर्न रूप म्हणजे 'बेब्लेड ' ). उन्हाळ्याच्या सुट्टीत तर ठरलेले असायचे , मामाच्या गावी हिरव्या गर्द आंब्याच्या झाडाला बांधलेला झोका अन '४-८-१२' हा खेळ . आजच्या मॉडर्न जगातील ल्युडोचे ते गावरान रुपडे. संख्या बघण्यासाठी ठोकळा किंवा डायस  न वापरता चिंचोके  वापरले जात . 
                   तसेही आजच्या धावपळीच्या  जगात इतका वेळ नाही कोणाकडे खेळ खेळायला . पण जग पुन्हा त्याकडे वळताना दिसतंय . आठवडाभर मॅनेजरच्या तणावात काम करणाऱ्याना तणावमुक्त होण्यासाठी ऑफिसमधेच असले खेळ घ्यायला लागलेत . अन जुन्या खेळांना पुन्हा नव्याने महत्त्व प्राप्त झालय. आजचा पाहिलेला चाक अन काठी , लिंबू- चमचा , रस्सीखेच , पोते -शर्यत अन अजून बरेचसे . याच खेळांना स्मार्टफोनमुळेही वेगळे महत्त्व येतेय. लहान मुलांबरोबरच मोठयांनाहि खेळण्यासाठी हेच मैदानी खेळ मोबाईल अन संगणकावर अवतरलेत. ( क्रिकेट अन फ़ुटबाँल त्याचे उत्तम उदाहरण . ) . उद्या परवा लहान मुले ' ऑनलाईन ' लपंडाव खेळत असतील तर आश्चर्य वाटून  घेऊ नका !!!