फिरस्ती
काही दिवसांपूर्वी, ट्रेनिंगला जायचं असा विषय नुकताच चालु झालेला होता. अन महाडला जायचं असं सर्वानुमते ठरलं. २९ तारखेच्या दुपारी १ च्या सुमारास आम्ही निघालो.
दुसरी-तिसरी मध्ये असताना बालभारतीच्या पुस्तकात वाचलेलं कोकणाचं वर्णन आज प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. ती सर्वत्र असलेली लाल-तांबूस माती , आज तिचा स्पर्श पायांना जाणवला. उंचच-उंच असलेली ताडा-माडाची बंधुवृक्ष जणू आमच्या स्वागतास रस्त्याच्या दुतर्फा उभी होती. पुण्याहून निघाल्यावर साधारण ३०-४० किमी रस्ता दुपदरी होता अन त्यानंतर पुढे घाटाचा रस्ता सुरु झाला तर तो महाड येईपर्यंत. ताठ मानेने उभी असलेली डोंगररांग, अन तिने नेसलेली गर्द वनराई. त्यावर असलेली दाट धुक्याची दुलई. सारे काही नयनरम्य अन डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. त्या लांबवर पसरलेल्या डोंगररांगेवरून नजर हटत नव्हती.
संध्याकाळी ६च्या सुमारास आम्ही मित्राच्या घरी पोहोचलो होतो. त्यांचीच एक वापरात नसलेली खोली आम्हाला रहायला देण्यात आली होती. रात्री जेवणानंतर आम्ही शतपावली करत महाडचे ऐतेहासिक चवदार तळे पाहिले. जे बाबासाहेब आंबेडकरांनी सामान्य जनतेसाठी खुले करण्यास आंदोलन केले होते.
दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही किल्ले प्रतापगडावर कुच केली. वातावरण तर अगदी काल प्रमाणेच आल्हाददायक होतं. आजचा मार्ग वेगळा होता, पण वाट मात्र तिच होती , जुनी वळणावळणांची नागमोडी. तिच्याकडे पाहून आयुष्यासोबत तिची तुलना करावीशी वाटते.
दुर्गम असलेला प्रतापगड केवळ पायथ्यापासून पाहिल्यास समजते स्वराज्य अभेद्द्य का होते . महाराष्ट्रातील एकूण एक किल्ला असाच डोंगर-दर्यात अन दुर्गम भागात वसलेला आहे.शिवाजी महाराजांनी उपलब्ध भौगोलिक परिस्थितीचा कल्पकतेने वापर केल्याचं समजतं. अन म्हणूनच पाऊण लाख पायदळ , हजारातालं हत्ती अन घोडदळ असून देखील धिप्पाड देहाचा अफजलखान चारी मुंड्या चित झाला होता. तो पराक्रम ह्याच प्रतापगडावर घडलेला."त्या" घटनेची साक्ष देत प्रतापगड ४०० वर्षांपासून तटस्थपणे स्वराज्याची ग्वाही देतोय.
गडाला पायर्या तश्या कमीच आहेत. सध्या पर्यटनासाठी किल्ल्याच्या डागडुजीचं देखील काम चालू आहे. किल्ल्याचं शत्रूपासुन रक्षण करण्यात महात्त्वचा वाटा असलेल्या "माची" आजही जुनी धमक बाळगून आहेत .अन त्यातल्या एका माचीवर उंचावर असलेला भगवा , स्वराज्यासाठी मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचं प्रतिक म्हणून दिवस-रात्र फडकतोय. प्रतापगडाला निरोप देऊन आम्ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण "महाबळेश्वर"ला निघालो. गडापासून केवळ १५-२० किमी अंतरावर ते वसलय.
पुन्हा नागमोडी वळणाना पार करत थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो. महादेवाचं स्वयंभू लिंग तिथे स्थापित झालय. त्याचं दर्शन घेऊन पर्यटकांचं आकर्षण असलेले points ला भेट देण्यास निघालो. Monkey point, Aurtherseat point ,Tiger spring point ,Echo point… असे खूप सारे बघण्या योग्य आहेत. त्यातही Aurtherseat point ला असलेलं दृश्य डोळ्यांचे पारणे फेडनारेच आहे. दूरपर्यंत जिथवर नजर जाइल तिथपर्यंत फक्त डोंगर अन घनदाट जंगल पसरलय. उन-वारा-पावसात देखील डोंगरांनी स्वताचं सौंदर्य जपुन ठेवलय. पट्टीत ठराविक आकाराची झालेली झीज अन वरून ढगांची विरळ सावली त्याची शोभा अजूनच वाढवतं . कॅमेरयात आणि डोळ्यात ते सारं मनोहर चित्र कैद करून आम्ही जवळच असलेल्या पाचगणीला भेट दिली.
आयुष्यात देखील असेच वळणं येत असतात अन माहित नसतं समोर काय आहे… निसर्ग हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे, ते उगीच नव्हे…